भाईंदर :- मिरा-भाईंदरमध्ये ८ जुलै रोजी निघणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र मोर्चेकरी ठाम असून त्यांनी मोर्चासाठीची तयारी सुरू ठेवली आहे.

मिरा रोड येथील एका मिठाई विक्रेत्याने मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याच्या प्रकरणावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना अलीकडेच घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले.या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दंगल आणि अन्य सात कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर व्यापारी संघटनांनी ‘हिंसेच्या माध्यमातून भाषेची सक्ती केली जात आहे’ असा आरोप करत २ जुलै रोजी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला होता.

मात्र, व्यापाऱ्यांचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत होता आणि समाजात तणाव निर्माण करणारा असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्यामुळे भाजपचे राजकारण उघड करून, मराठी अस्मिता जपण्यासाठी ८ जुलै रोजी मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी जाहीर केले होते.

दरम्यान, ५ जुलै रोजी पार पडलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर, या मोर्चाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, मराठी एकीकरण समिती व इतर संघटनांचे समर्थन मिळाले आहे. या संघटनांनी मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

या मोर्चाचे आयोजन मिरा रोडमधील वादग्रस्त जोधपूर मिठाई दुकानाजवळून कौस्तुभ राणे स्मारक (मिरा रोड रेल्वे स्थानकाजवळ) येथे करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी या मार्गासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र या परिसरात शाळा, रुग्णालये, वाहतूक आणि सामान्य नागरिकांची वर्दळ असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चार दिवसांपूर्वी मराठी नागरिकांविरोधात व्यापाऱ्यांनी मिरा-भाईंदर शहरात मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. आम्ही नियम पाळून परवानगी मागितली, तरीही पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र मराठी अस्मिता टिकवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे.” – संदीप राणे, मनसे शहरप्रमुख (मिरा-भाईंदर)