वसई:- वसई विरार शहरा एकापाठोपाठ एक अशा आग दुर्घटना समोर येत आहेत. बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या एका इमारतीच्या ९ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे.
नालासोपारा पूर्वेच्या भागात लंबोदर अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीत मोठ्या संख्येने कुटुंब राहतात. बुधवारी अचानक नवव्या मजल्यावर असलेल्या एका बंद सदनिकेला आग लागली होती. या आगीची माहिती तातडीने येथील नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले.
घरातील रहिवाशी कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यावेळी घरात कुणी नसताना ही आग लागली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून घरातील साहित्य जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकताच झाले आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी नालासोपारा पूर्वेच्या चंदननाका येथे कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली होती. सातत्याने आग दुर्घटना समोर येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली जात आहे.
आगी नेमक्या का लागतात
वसई विरार शहरात विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या आग दुर्घटनांमध्ये सर्वाधिक आगी या शॉट सर्किट झाल्याने लागल्या आहेत. यासाठी घरातील, दुकानातील, कारखान्यात विद्युत लेखापरीक्षण करून करून घेणे आवश्यक असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.