वसई : विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त व अपघात ग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज भासते. मात्र पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत रक्ताची भीषण टंचाई निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ रक्तपेढी पैकी २ ठिकाणच्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध आहे.त्यामुळे  रुग्णांसाठी रक्त मिळविताना नातेवाईकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात साथीचे आजार व डेंगीचे रुग्ण, तसेच थॕलेसमिया रुग्ण, प्रसूती, कर्करोग रुग्ण, विविध अपघातांतील जखमीं अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा रुग्णांना रक्ताची गरज भासते. रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे यासाठी पालघर जिल्ह्यात ९ ठिकाणी रक्तपेढ्या आहेत. त्यातील दोन रक्तपेढ्या या शासकीय असून बाकीच्या चॅरिटेबल ट्रस्ट व सामाजिक संस्था यांच्या आहेत.

त्यातून रुग्णांना रक्त गटा नुसार रक्त उपलब्ध करून दिले जाते. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील रक्तपेढ्यामध्ये रक्तसाठाच उपलब्ध नसल्याने रक्ताची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. नऊ रक्तपेढ्या पैकी केवळ फक्त दोनच रक्तपेढ्यामध्ये रक्त उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी सुद्धा चांगलीच धावपळ करावी लागत आहे. अनेकदा जो रक्तगट हवा ते रक्त वेळेत मिळत नसल्याने मुंबई यासह विविध ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. करोनाच्या संकटकाळात ही मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिबिरे भरवून रक्तसंकलित करण्यात आले होते.

हेही वाचा : वसई विरार शहरात ३ नवीन पोलीस अधिकारी

१) ई रक्त कोष सर्च करा

एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते अशा वेळी नेमके रक्त कुठे मिळेल याची माहिती नसल्याने अडचणी येतात. अशा वेळी ई रक्त कोष सर्च केल्यास कोणत्या ठिकाणी रक्तसाठा उपलब्ध आहे याची माहिती मिळण्यास मदत होते.

२) रुग्णालयांची जबाबदारीकडे पाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्याची गरज असते त्यावेळी नियमानुसार रक्त पुरविण्याची व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे. असे असताना काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करायला सांगत असतात. एकप्रकारे रुग्णालये ही जबाबदारीकडे पाठफिरवत असल्याचा आरोप रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. याशिवाय ज्या प्रमाणे सामाजिक संस्था रक्ततुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान शिबिरे घेतात तशी शिबिरे रुग्णालयांनी सुद्धा घ्यायला हवीत तसे होत नसल्याने अडचणी येत आहेत असेही ढगे यांनी सांगितले आहे.