वसई: बांग्लादेशातून पळवून आणलेल्या १२ वर्षाच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले असून तिच्यार तीन महिन्यात २०० जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी ९ जणांना अट करण्यात आली असून त्यात ४ बांग्लादेशी नागरिकांचा समावेश आहे.

२६ जुलै रोजी नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने १२ वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका केली होती. एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. सुटका झालेल्या १२ वर्षीय बांगलादेशी मुलीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्यावर गुजरात नाडीयाड यासह अन्य ठिकाणी तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आतापर्यंत नऊ दलालंना अटक केली आहे. यात मोहम्मद खालिद बापरी (३३), जुबेर हारून शेख (३८), शमिम सरदार (३९), रुबी बेगम खालिद (२१) या ४ बांग्लादशी घुसखोरांचा समावेश आहे. उज्जल कुंडू (३५), परवीन कुंडू (३२) हे विरारच्या आगाशी येथे राहणारे आहेत. प्रीतिबेन मोहिडा (३७) आणि निकेत पटेल (३५) हे गुजराथचे दलाल आहेत. सोहेल शेख (२३) हा दलाल आहिल्यानंगरचा आहे.

प्रकरण काय ?

एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही एक शाळकरी विद्यार्थी आहे. एका विषयात ती नापास झाली, त्यावेळी आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीपोटी तिने घर सोडलं. एका ओळखीच्या महिलेने तिला आधी कलकत्त्यात आणल. तिथे तिचे फेक डाक्युमेंट बनवले. त्यानंतर गुजरातच्या नाडियाड येथे आणलं, तेथे एका वृध्द व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले, तिचे अश्लिल फोटो काढले आणि त्यानंतर ब्लॅकमेल करुन, तिला देहव्यापारात ढकलण्यात आले. तसेच त्यानंतर श्याम कांबळे पुढे म्हणाले की, तिला मुंबईला आणण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले.

अद्याप किशोरावस्थेत न पोहोचलेल्या त्या निरागस मुलीला देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले. अशावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. एन.जी.ओ. आणि पोलिसांनी सुटका केल्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिलं आहे. मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क झाला आहे. तिचे पारपत्र आणि व्हिजा तयार करून लवकरच तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी दिली.