वसई: घरची आर्थिक स्थिती ठिक करण्यासाठी मांत्रिकाचा आधार घेणार्‍या एका तरुणीला दीड लाखांचा गंडा घालण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी ३ जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी पटेल (२०) ही तरुणी सांताक्रुझ येथे राहते. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती. दरम्यान तिने सप्टेंबर महिन्यात वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली होती. मिरा रोड येथील मुस्ताक शाह नावाच्या मांत्रिकाने जादूटोणा करून आर्थिक परिस्थिती सुधारेल असा दावा केला होता. त्यानुसार या तरुणीने मांत्रिकाला संपर्क केला. मांत्रिकाने दोन वेळा पूजा विधी करण्याच्या नावाखाली १ लाख ७ हजार आणि नंतर ३२ हजार रुपये घेतले होते. पीडित तरूणीने गुगलपेद्वारे आणि रोख स्वरूपात ही रक्कम दिली होती. २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात हा पूजा विधी करण्यात आला. मात्र तक्रारदार तरूणीच्या आर्थिक परिस्थितीत काही बदल झाला नाही. मात्र या मांत्रिकाने दोन रेड्याचा बळी द्यावा लागेल असे सांगून आणखी पैशांची मागणी केली. ती पूर्ण न केल्यास घरातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल, अशी भीती घातली.

हेही वाचा : रेमो डिसोजा, पोलीस कर्मचार्‍यासह ७ आरोपी; डान्स ग्रुपच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक

यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार तरुणीने नया नगर पोलीस ठाणे गाठले. आम्ही या प्रकरणी मुश्ताक शाह, जावे आणि रिजाझ चौधरी आदी तीन भोंदू मांत्रिकांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा समूळ उच्चाटन अधिननियम २०१३ च्या कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

ढोंगी बाबाकडून बलात्काराच्या यापूर्वीच्या घटना

९ मे २०२४

जादू टोण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढणाऱ्या विनोद पंडित नावाच्या ढोंगी बाबाला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. हस्तरेखातज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या हा ढोंगी बाबा फेसबुकवर जाहिरात करून महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असे.

हेही वाचा : रॉंग नंबर तिला महागात पडला..; तरुणाने फसवून केला बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ जुलै २०२३

भाईंदर मध्ये मुकेश दर्जी नावाचा एक मांत्रिक एका महिलेवर विविध उपचारांच्या नावाखाली दोन वर्ष बलात्कार करत होता. त्याला भाईंदर पोलिसांनी अटक केली होती.