वसई : मत्स्य दुष्काळाचा परिणाम हा सुक्या मासळीच्या व्यवसायावरही झाला आहे. ऐन मासळी सुकविण्याच्या हंगामात समुद्रातून हवी त्या प्रमाणात मासळीच येत नसल्याने मासळी सुकविण्यासाठी तयार केलेल्या पराती रिकाम्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर वसई विरार मधील अर्नाळा, पाचूबंदर, किल्लाबंदर, नायगाव कोळीवाडा अशा भागांत मासळी सुकविण्याचे काम सुरू होते. यात विशेषतः बोंबील, मांदेली, वाकटी, जवळा व अन्य ओली मासळी सुकविण्यासाठी बांबूच्या परातीवर तसेच जेट्ट्यांवर ठेवली जाते. ती सुकवून झाल्यानंतर ती बाजारात विक्रीसाठी आणली जाते अनेक कुटुंबांचा त्यावरच उदरनिर्वाह होतो.

परंतु, यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मासळीची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. मासळी साठ्यात वाढ व्हावी यासाठी वसईतील मच्छिमार संघटनांनी चाळीस दिवस स्वघोषित मासेमारी बंद करून बोटी किनाऱ्यावर ठेवल्या होत्या. मासळीच मिळत नसल्याने आता सुकविण्यासाठी सुद्धा पुरेशी मासळी मिळत नसल्याचे सुक्या मासळी व्यावसायिकांनी सांगितले आहे. दरवर्षी मासळी सुकविण्याच्या बांबूच्या पराती या मासळीने भरलेल्या असतात. परंतु यावर्षी अपुऱ्या मत्स्य साठ्यामुळे मासळी सुकविण्याच्या पराती या रिकाम्या असल्याचे चित्र किनारपट्टीवर दिसून येत आहे. मासळी मिळत नसल्याने सुकविणार काय असा प्रश्न आता या व्यावसायिकांना पडला आहे.

हेही वाचा : भाईंदर : विकासकाकडून महापालिकेची फसवणूक, मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले पाचशे खाटांचे रुग्णालय तात्पुरते स्थगित

वसईतील सुक्या मासळीचा व्यवसाय करणारे सुकविण्यासाठी मच्छीमारांकडून बोंबील, वागटी यांसह इतर मासळी विकत घेतात. यंदा मासळीची आवक घटल्याने मासळी महागली आहे. ओल्या बोंबील एक पूर्ण ड्रम हा आता तीन ते साडेतीन हजाराला मिळत आहे. दीड ते दोन पटीने या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सुरूवातीला ३०० ते ४०० रुपये शेकडा असलेले सुके बोंबील आता ६०० रुपये इतके झाले आहेत. मासळीच्या किंमती वाढल्या असल्याने मासळी कोणत्या भावात विकायची असाही प्रश्न निर्माण होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. “यंदाच्या वर्षी सुकी मासळीचा व्यवसाय ही फारच अडचणीचा आहे. समुद्रात मिळणारी मासळी कमी झाल्याने त्याचा हा परिणाम जाणवत आहे.”, असे अर्नाळा येथील मच्छिमार भगवान बांडोली यांनी म्हटले आहे.

आवक का घटली ?

पारंपारिक पद्धत सोडून नियमबाह्य पध्दतीने अनिर्बंध मासेमारी होऊ लागली आहे. विशेषतः माश्यांच्या प्रजनन काळ व वाढीचा काळ यातही होत असलेल्या मासेमारीमुळे मासळीचे साठेही नष्ट होऊ लागले असून मत्स्योत्पादन प्रचंड प्रमाणात खालावले आहे. यंदाच्या वर्षी तर मासेमारी सुरू झाल्यापासून हव्या त्या प्रमाणात मासेच जाळ्यात आले नाहीत. तर दुसरीकडे तेल साठे शोधण्यासाठी होत असलेले भूगर्भ सर्वेक्षण सुद्धा मासे प्रजाती कमी होण्याचे कारण असल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे.

हेही वाचा : भाजप नगरसेवकाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप, व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासळी सुकविण्याच्या जागाच नष्ट

वसई पश्चिमेच्या किल्ला बंदर व पाचूबंदर या भागातील समुद्रात होत असलेल्या अनिर्बंध वाळू उपशाचा परिणाम किनारपट्टीवर झाला आहे. मागील वर्षापासून या भागातील समुद्रात छुप्या मार्गाने बेसुमार वाळू उपसा होऊ लागला आहे. त्यामुळे किनारा खचून मासळी सुकविण्यासाठी जागाही नष्ट झाली आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांचा सुक्यामासळीचा व्यवसाय अडचणींत सापडू लागला आहे. मासळी सुकविण्यासाठी मोकळी जागाच नसल्याने मासळी सुकविणार तरी कुठे असा प्रश्न येथील मच्छीमारांना पडला असल्याचे येथील मच्छीमार सांगत आहेत.