वसई : वसई विरार मधील लॅबमध्ये स्वाक्षरी करणार्‍या गुजरातमधील डॉक्टर राजेश सोनी याला महाराष्ट्रात प्रॅक्टीस करण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषदेने याबाबत लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वसई विरार शहरातील खासगी लॅबमध्ये रुग्णांना चुकीचे वैद्यकीय अहवाल दिले जात असल्याचे प्रकऱण समोर आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील ६ खासगी लॅबमध्ये गुजरातमधील एक डॉक्टर राजेश सोनी याच्या स्वाक्षरीने रक्त, मलमुत्र तपासणीचे अहवाल दिले जात होते. विशेष म्हणजे सोनी याची मान्यता रद्द झाली असताना देखील तो स्वाक्षरी करून अहवाल देत असल्याचा आरोप होता. यामुळे रुग्णांना चुकीचे अहवाल जाऊन त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पालिकेने श्रीजी पॅथोलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टीक सेंटर, गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरी, ग्लोबल केअर ॲण्ड वेल्फेअर डायग्नोस्टिक सेंटर, आणि धन्वंतरी या लॅब चालकांना नोटीस पाठवून त्या बंद करण्याचे आदेश दिले होते. या लॅब बंद असल्या तरी बेकायेदशीरपणे स्वाक्षरी करणारा डॉक्टर राजेश सोनी आणि ६ लॅब चालकांवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा : वसईच्या किनारपट्टीवर बेकादयेशीर मद्य विक्री, समुद्रकिनार्‍यावर मद्य पार्टी; उत्पादनशुल्क आणि पोलिसांचे संगनमत

पालिकेने याबाबत पोलिसांकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही पोलिसांनी तांत्रिक कारण देत गुन्हा दाखल केला नव्हता. यामुळे महाराष्ट्र वैद्यक परिषद (एमएमसी) चा अधिकृत अहवाल गरजेचा होता. यासंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे माहिती मागितली असता परिषदेकडे नोंदणी नसलेल्यांना राज्यात प्रॅक्टीस करता येत नाही असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) लेखी उत्तरात सांगितले आहे. गुजरात मधील डॉक्टर राजेश सोनी याचा परवना २०२१ मध्येच संपला आहे. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रात प्रॅक्टीस करणे बेकायदेशीर आहे. त्याचा परवाना जरी अधिकृत असता तरी तो गुजरात मध्ये राहून वसई- विरार मधील लॅबचे नमुने तपासणे शक्य नाही. त्यामुळे ही दुहेरी फसणूक आहे असा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने केला आहे.

हेही वाचा : शहरबात : समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार…

वैद्यकीय परिषद केवळ नोंदणीकृत व्यवसायिकांवर नियमानुसार कारवाई करते. डॉक्टर राजेश सोनी याचे नोंदणीकरण २०२१ मध्येच संपले आहे आणि ते अनोंदणीकृत म्हणजेच बेकायेदशीर व्यवसाय चालवत असल्याने महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायदा १९६१ ३३(२) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी केली आहे. सोनी याने केवळ वसई विरारमध्येच नाही, तर पालघर आणि मीरा भाईंदर मधील लॅबमध्ये देखील डिजिटल स्वाक्षरी केलेले अहवाल दिले आहेत. त्याप्रकरणी देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या बोगस लॅब प्रकरणी नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai illegal lab case dr rajesh soni is not registered with the maharashtra medical council css
First published on: 27-12-2023 at 13:06 IST