वसई : डुलकी लागल्याची मोठी किंमत एका तरुणाला मोजावी लागली. त्याच्या गाडीतील दरवाजा काढून भामट्यांनी खिशातील दीड लाखांचा फोन लंपास केला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापाणे येथे ही घटना घडली. भामटे ‘हात की सफाई’ करून चोरी करण्यात वाकबगार असतात. रस्त्यावरून चालणार्‍यांचे फोन लंपास करणे हा प्रकार तर नियमित होतो. पण रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे अगदी दुचाकीवरून जाणार्‍या प्रवाशांचेही फोन लंपास केले जातात. परंतु गाडीत डुलकी घेत असेलल्या एका तरुणाचाही महागडा आयफोन चोरांनी लंपास केला आहे.

हेही वाचा : ‘पुढे दंगल सुरू आहे’, ‘सेठ साड्या वाटतोय…’, ऐंशीच्या दशकातील फसवणुकीच्या पध्दती आजही सुरू

वसईत राहणारा अभिजित राणे (३३) हा रविवारी रात्री मुंबई अहमदाबाद महामार्गावरून घरी येत होता. बापाणे येथील लोटस ढाब्याजवळ त्याचा मित्र भेटणार होता. त्याची वाट पाहत अभिजित गाडीत बसला होता. मात्र त्याला डुलकी लागली. यावेळी अज्ञात चोरांनी त्याच्या गाडीचे दार उघडून अलगद त्याच्या खिशातील महागडा ‘आयफोन प्रो १४’ हा फोन लंपास केला. राणे याने सप्टेंबर महिन्यातच हा दीड लाख रुपये किंमतीचा फोन घेतला होता. या प्रकरणी गुरूवारी त्याने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरवातीला पोलिसांना अशा प्रकारे चोरी झाल्याचा विश्वास बसत नव्हता. मात्र खात्री पटल्यानंतर पोलिसांनी कलम ३७९ अनव्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : माजी महापौर रुपेश जाधव यांना ईडीची नोटीस? “नोटीस बनावट, गुन्हे दाखल करणार” – रुपेश जाधव

असे उघडले गाडीचे दार

राणे याच्या गाडीला रिमोटची चावी होती. अशा गाड्यांमध्ये जर आत मालक असेल तर बाहेरून दाराची छोटी कळ दाबून दार उघडता येते. चोरांनी याच तांत्रिक त्रुटीचा फायदा घेतला आणि दार उघडून आत झोपलेल्या राणेच्या खिशातील फोन काढून घेतला.