वसई: वसई पश्चिमेतील पंचवटी नाका येथे वीज रोहित्राच्या खालीच दुकानांची ( टपऱ्या ) उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शहरात ठिकठिकाणी वीज रोहित्र कोसळण्याच्या आणि विजेच्या तारांना आग लागण्याच्या घटना घडत असताना अशा प्रकारे धोकादायक पध्दतीने टपऱ्या टाकण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पंचवटी नाका हा वसई रेल्वे स्थानकालगतचा प्रमुख वर्दळीचा भाग मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी व वाहनांची ये-जा होत असते. याच ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या विजेच्या रोहित्राखाली टपरी उभारण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी या टपरीवर ग्राहकांची गर्दी उसळते. मात्र, नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा ठिकाणी व्यवसाय सुरू असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांत वसई-विरार शहरात रोहित्र कोसळण्याच्या, विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आग लागण्याच्या तसेच विजेचा शॉक बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशाच प्रकारची दुर्घटना पंचवटी नाक्यावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नागरिकांचं म्हणणं आहे. यासाठी अशा धोकादायक पद्धतीने सुरू केलेल्या टपरीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
अशा प्रकारे रोहित्राच्या खालीच थेट व्यवसाय करणे धोकादायक आहे. यासाठी संबंधित दुकानदाराला आम्ही नोटीस पाठवू असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. तसेच याबाबत महापालिकेला ही कळविले जाईल. तर महापालिकेच्या प्रभाग समिती एच च्या सहायक आयुक्त संगीता घाडीगांवकर यांनी सदर ठिकाणाची पाहणी करून योग्य ती कारवाई करू असे सांगितले आहे.