वसई : विरारच्या चिखलडोंगरी गावात सुरू असलेली जात पंचायत कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. मागील महिन्यात ज्या २० जणांकडून दंड आकारला होता त्यांना दंडाची रक्कम परत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणाला लोकसत्ताने वाचा फोडल्याने न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. विरार पश्चिमेच्या चिखलडोंगरी गावात बेकायदेशीरपणे जात पंचायत सुरू असल्याचे प्रकरण ‘लोकसत्ताने’ (८ नोव्हेंबर रोजी) उघडकीस आणले होते.

जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍या ग्रामस्थांना क्षुल्लक कारणांवरून २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात होता. या बातमी नंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी १७ जणांविरोधात समाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर वसईच्या तहसिलदारांनी देखील गावात सभा घेऊन ही प्रथा बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता चिखलडोंगरी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली जात पंचायत बंद केली आहे. गावात दवंडी पिटवून जात पंचायत बरखास्त केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामस्थाला व्यक्तिगत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : वसई : नायगाव पोलीस ठाण्यातून आरोपी फरार

दंडाची रक्कम परत करण्यास सुरुवात

मुरबाड येथील सासणे येथे श्री दत्तगुरू देवस्थान ट्रस्ट बरोबर गावातील जात पंचायतीचा वाद होता. या दत्तगुरू देवस्थानच्या गुरूमाऊली जोशी या गावात आल्या होत्या. त्यांना भेटायला गेलेल्या २० जणांना जात पंचायतीने प्रत्येक ५० हजार रुपयांचा दंड आकारला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घेतलेला दंड परत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या २० जणांपैकी ९ जणांनी दंडाची रक्कम भरली होती तर उर्वरित लोकांनी दंड भरण्याची मुदत मागितली होती. त्या ९ जणांना दंडाची रक्कम परत केल्याची माहिती जात पंयायती मधील एका सदस्याने दिली. उमेश वैती आणि दर्शन वैती या दोन जणांशी संपर्क होत नसल्याने त्यांना दंडाची रक्कम परत करण्यात आलेली नाही. ते बहिष्कृत केल्याने गावातून परागंदा झाले आहे. ते गावात आल्यास त्यांची माफी मागून दंडाची रक्कम परत केली जाईल असेही जात पंयायतीने सांगितले.

हेही वाचा : वसई: पापडखिंड धरणात छट पूजा, पाणी प्रदूषीत

ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद

जात पंचायत प्रथा बंद झाल्याबद्दल खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. आम्ही सतत दबावात असायचो. क्षुल्लक कारणावरून वाळीत टाकून दंड आकारला जात होता. मी फक्त गुरूमाऊलीला भेटायला गेलो तर मला ५० हजार रुपये दंड आकारला होता. आता लोकसत्ताने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर मला दंडाची रक्कम परत करण्यात आली आहे, असे गावातील देंवेद्र राऊत यांनी सांगितले. आता आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आमचे आर्थिक शोषण थांबले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा : वसईकरांना सुर्या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी मिळू लागले; पाणी आल्यानंतर श्रेय वादासाठी राजकीय चढाओढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते दोन ग्रामस्थ अद्याप भूमीगत

गावाने बहिष्कार घालून वाळीत टाकलेले उमेश वैती आणि दर्शन राऊत हे दोघे अद्याप गावात परतलेले नाहीत. ते दोघे भीतीपोटी अज्ञात स्थळी लपून रहात आहेत. त्यांचा रोजगारही बुडाला आहे. गावात परतल्यास दगाफटका होण्याची भीती त्यांना वाटते. परंतु ते गावात आल्यास त्यांचे स्वागत करून कसलाही त्रास दिला जाणार नाही अशी हमी बरखास्त झालेल्या जात पंचायत समितीच्या सदस्यांनी दिली आहे.