वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूनवघर जवळ बॉक्स कलव्हर्ट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र कामाच्या दरम्यान ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याचा आरोप वाहतूक पोलिसांनी केला आहे. वाहतुकीसाठी केवळ एकच मार्गिका खुली राहत असल्याने वाहनांच्या रांगा लागून कोंडी होऊ लागली आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पडणारे पाणी व सांडपाणी याचा निचरा होण्यासाठी जागोजागी बॉक्स कलव्हर्ट तयार केली जात आहेत.सद्यस्थितीत ससूनवघर येथील प्रीतम ढाब्याजवळ बॉक्स कलव्हर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे.

या कामाचा ठेका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मे. निर्मळ एंटरप्राइजेस या कंपनीला दिला आहे. मात्र ठेकेदाराकडून मुंबई व गुजरात दोन्ही वाहिन्यांवर एकाच वेळी कामे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुक व्यवस्था विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून हलक्या व जड अवजड वाहनांची संख्या प्रचंड आहे. अशा वेळी योग्य ते नियोजन करून काम मार्गी लावणे गरजेचे असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. मात्र कामाच्या दरम्यान नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप वाहतूक पोलिसांनी केला आहे.

मुंबईच्या दिशेने जाण्यास तीन मार्गिकापैकी केवळ एक मार्गिका खुली आहे. तर गुजरात वाहिनीवर दीड मार्गिका खुली आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही वाहतूक नियंत्रण करताना ही अडचणी येत असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.

एका मार्गिकेवर काम सुरू ठेवून दोन मार्गिका या वाहतुकीला खुल्या राहणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे विघ्न उभे राहण्याची शक्यता असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले आहे. काम सुरू करताना वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांना याची योग्य ती माहिती दिली पाहिजे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे ही आम्ही तक्रार दिली आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे.

महामार्गावर वाहनांची वर्दळ खूप आहे. विशेषतः रात्री जड अवजड वाहनांची अधिक भर पडते. यासाठी कामाचे योग्य ते नियोजन करून काम करायला हवे तसे न झाल्याने वाहतूक विस्कळीत होऊन त्याचा त्रास वाहतूक पोलिसांनी सहन करावा लागतो.

अरविंद चौधरी, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक चिंचोटी महामार्ग

नियोजन करण्याच्या सूचना

पावसाळ्याच्या आधी महामार्गावरील कलव्हर्ट तयार करणे व जे तयार झाले आहेत त्याठिकाणी काँक्रिटीकरण करणे अशी कामे पूर्ण झाली पाहिजे. जे ठेकेदार नेमले आहेत त्यांना दीड लेन वाहतुकीला खुली राहील याचा विचार करून काम करावे अशा सूचना दिल्या असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. वाहतुक सुरळीत राहिल याचा विचार करूनच कामे घेतली जात आहेत. त्यामुळे वाहन चालक व पोलीस यांनीही सहकार्य करायला हवे असेही त्यांनी सांगितले आहे.

प्रवाशांची कोंडी

नुकताच घोडबंदर येथील घाटातील कामामुळे महामार्गावर झालेल्या कोंडीचा फटका प्रवाशांना बसला होता. त्यातून दोन दिवसांपूर्वीच सुटका झाली असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.