वसई: रेल्वे लोकल गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मोबाईल चोरीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे वसई रेल्वे पोलिसांनी विविध ठिकाणच्या भागात गस्त वाढविली आहे. मिररोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची हद्द आहे यामध्ये एकूण सात स्थानकांचा समावेश आहे .या स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने व वसई दिवा मार्गाने ये जा करीत असतात लोकल मध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना. अनेक प्रवासी हे हातात मोबाईल घेऊन उभे असतात. अशा प्रवाशांच्या हातावर फटका मारतात व मोबाईल खाली पडताच मोबाईल घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे.
विशेषतः ज्या ठिकाणी गाड्या स्लो होतात अशा ठिकाणी हे फटका मारणारे दबा धरून बसून राहतात. वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई नालासोपारा, दिवा वसई मार्ग, मिररोड ते दहिसर नाल्याजवळ अशा तीन ठिकाणी फटका पॉईंट असल्याचे निदर्शनास आले आहे. काही वेळा रुळांच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांच्या जवळच किंवा झाडांमध्ये लपून बसलेले लोखंडी किंवा लाकडी वस्तूने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात. यामुळे यापूर्वी प्रवाशांना आपला जीव व तर काही प्रवासी जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नये यासाठी आता वसई रेल्वे पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेत त्या ठिकाणी गस्त वाढविली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.
रेल्वे लोकलने प्रवास करताना प्रवाशांनी सुद्धा सावध राहून प्रवास करावा. दरवाजात उभे राहून मोबाईल बघणे टाळावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. तसेच प्रवाशांना अशा प्रकारे कोणी संशयित दिसून आला तरीही त्याची माहिती पोलिसांना द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी गस्त घालून अशा फटका चोरांना आळा घालता येईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.
फटका आरोपीला अटक
नुकताच वसई रेल्वे मार्गावर गस्त सुरू असताना एका फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वसई रेल्वे पोलिसांना यश आले आहे.गुफारान खान (२०) असे या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी सुद्धा त्याने अशा प्रकारे फटका मारुन मोबाईल चोरी केले असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नव्याने तयार होणाऱ्या फटका पॉईंटचे आव्हान
वैतरणा ते मिररोड दरम्यान वसई रेल्वे पोलिसांच्या मार्फत लक्ष दिली जात आहेत. हातावर फटका मारून मोबाईल व इतर वस्तू घेऊन पळ काढण्याच्या घटना संदर्भात प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या त्यानुसार गस्त वाढविली आहे. काही फटका मारून चोरी होत असल्याची ठिकाणे निश्चित करून कारवाया सुरु आहेत. मात्र नव्याने तयार होणाऱ्या फटका पॉईंटवरही लक्ष ठेवण्यासाठीचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.