वसई : नालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करून अपघात झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. पेल्हार पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या प्रकरणात हत्येच्या कटात सहभागी असणार्‍या ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नालासोपारा पुर्वेच्या धानिव बाग येथे राहणारा रिजाय अली (५५) हा पत्नी आणि अन्य परिचितांसोबत २१ ऑगस्ट रोजी कळंब समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेला होता. तेथे त्याचा अपघात झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु नेमका अपघात कुठे आणि कसा झाला याची माहिती त्याची पत्नी मन्सुरा (३५) देऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासामध्ये पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : वसई: महामार्गावर गुटख्याची तस्करी; नायगाव पोलिसांकडून तीन आरोपींना अटक ; १ कोटीचा मुद्देमाल जप्त

अशी केली हत्या

मयत रियाजची पत्नी मन्सुरा ही नालासोपारा येथील गणेश पंडीत याच्या किराणा मालाच्या दुकानात काम करते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या २ ते ३ वर्षांपासून हे संबंध सुरू होते. या संबंधात तिचा पती रियाज अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याची योजना बनवली. त्यानुसार त्याला फिरण्याच्या बहाण्याने नालासोपारा पश्चिमेच्या कळंब समुद्रकिनार्‍यावर आणून त्याची हत्या केली. या प्रकरणी आम्ही मन्सुरी आणि तिचा प्रियकर गणेश पंडित याला अटक केली आहे. या प्रकरणी आणखी ६ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली. रियाज आणि मन्सुरा यांना दोन मुले आहेत.

हेही वाचा : मुलीचा संसार विस्कटल्याने वृध्द आईची आत्महत्या; मीरा रोड मधील घटनेने हळहळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद होती. मात्र हत्येचे नियोजन पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने गुन्हा पेल्हारमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.