वसई:- विरार रमाबाई इमारत दुर्घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा परीसरात जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा येथे . श्री गणेश को-ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी नावाची चार मजली इमारत आहे. यात १७ कुटुंब राहत होती. ही इमारत अनेक वर्षे जुनी झाली असल्याने रविवारी सकाळी अचानक या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका सदनिकेचा स्लॅब कोसळला. यात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दल व अधिकाऱ्यांना मिळताच घटनास्थळी पोहचून इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आले आहे. इमारत जीर्ण झाली असल्याने पालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती समोर आली आहे.सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पालिकेचा दुर्लक्षितपणा

शहरात सातत्याने अशा घटना घडत असून हे अत्यंत गंभीर आहे. वसई विरार महापालिकेने शहरातील इमारती धोकादायक ठरवून त्या दुरूस्त करण्याच्या संदर्भात नोटिसा दिल्या आहेत.मात्र त्या इमारतींची दुरुस्ती झाली आहे किंवा नाही याची पाहणी करणे गरजेचे आहे. तसे झाले नसल्याने अशा घटनांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी केला आहे.

विकासकाच्या वादामुळे काम झाले नाही

सदर इमारत ही ३० वर्षापेक्षा जास्त जुनी असून एप्रिल महिन्यात सदर इमारतीला महानगरपालिकेतर्फे लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. लेखापरीक्षण अहवालानुसार सदर इमारत ही सी२ए (C2A) या श्रेणीत मोडत असल्याने इमारत दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु इमारती मधील रहिवाशी, विकासक यांच्यामधील अंतर्गत वादामुळे इमारत दुरुस्तीचे काम करण्यात आले अशी माहिती महापालिकेने दिली आहे.