सुहास बिऱ्हाडे
वसई : भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरारमध्ये कार्यक्रमासाठी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. मात्र गडकरींच्या ठाकूर प्रेमामुळे भाजपच्या आनंदावर विरजण पडले. गडकरींना नेण्यासाठी हितेंद्र ठाकूरांची दोन कोटींची आलिशान गाडी होती आणि त्याचे सारथ्य खुद्द आमदार क्षितीज ठाकूर करत होते. त्यामुळे भाजपच्या मेळाव्यात वसई जिंकण्याच्या गडकरींच्या वल्गना पोकळ असल्याचे दिसून आले.
‘वसई जनता’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापन केलेली बँक. वसईतील या बँकेवर सध्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे पॅनल आहे. या बँकेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रण देण्यात आले. त्यामुळे वसई-विरार भाजपमध्ये आनंदोत्सव सुरू झाला झाला. भाजपने खास पक्षाच्या कार्यक्रमासाठी येण्याची गळ त्यांना घातली. नियोजित कार्यक्रमाच्या शेजारील सभागृहात जनसंवाद कार्यक्रम ठेवला आणि जोरात तयारी सुरू झाली. शुक्रवारी गडकरी विरारच्या जीवदानी येथे हेलिकॉप्टरने उतरले. पण त्यांच्या स्वागताला चक्क आमदार हितेंद्र ठाकूरांची सव्वादोन कोटींची आलिशान गाडी होती. खुद्द आमदार क्षितीज ठाकूर या गाडीचे सारथी बनले. माजी महापौर आणि बविआचे नेते राजीव पाटील यांनी तर हेलिपॅडपासून गडकरी हे ठाकूरांसोबत कसे हास्यविनोदात, गप्पांमध्ये रंगले त्याची रिल (चित्रफीत) बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. बँकेच्या कार्यक्रमात वर्चस्व ठाकूरांचे होते. राजशिष्टाचार म्हणूनही खासदार राजेंद्र गावित यांना आमंत्रण दिले नाही. गडकरी यांनीही भाषणात सतत ठाकूरांचे नाव घेऊन भलामण केली आणि थेट दिल्ली भेटीचे जाहीर आमंत्रण दिले.
हेही वाचा >>>कुख्यात भामटे अजय-विजय गजाआड; फसवणुकीच्या ६३ गुन्ह्यांची नोंद
यानंतर लगेच भाजप कार्यकर्त्यांशी जनसंवाद साधला. वसई-विरारमध्ये पूर्वी जी परिस्थिती होती, ती आता नाही. आपण वसई-विरारसह पालघर जिल्हा काबीज करू असे सांगून टाळय़ा मिळवल्या खऱ्या, पण सकाळी ठाकूरांशी गप्पा आणि दुपारी ठाकूरांच्या ताब्यातून वसई-विरार जिंकण्याच्या वल्गना केल्याने भाजपची गोची झाली आहे. वरिष्ठ नेत्यांनी ठाकूरांविरोधात किमान एक शब्द तरी बोलावे अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. पण इथे खुद्द गडकरीही ठाकूरांच्या प्रेमात दिसल्याने भाजपच्या उत्साहाला खीळ बसली.
आरोप-प्रत्यारोप
’ हितेंद्र ठाकूर हे १९९० पासून आमदार असल्याने सर्वाशी मैत्री आहे. गडकरी यांनीही मैत्री जपली. यात आमच्या मैत्रीचे भांडवल करून भाजप राजकारण करत आहे, असे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले. बँकेच्या कार्यक्रम असताना भाजपने बळजबरीने मेळावा घेऊन राजकारण केले, असेही ते म्हणाले.
’ गडकरी यांनी ठाकूरांचा पाहुणचार घेतल्याच्या घटनेने भाजपात नाराजी असली तरी यावर कुणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाही. वसई-विरार भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी मात्र हा बँकेचा कार्यक्रम होता, तरी खासदार राजेंद्र गावित यांना कार्यक्रमात डावलून बहुजन विकास आघाडीने राजकारण केल्याचा आरोप केला.