वसई:– वसई पूर्वेच्या गाव पाड्यातील पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी कामण नदीवर देवकुंडी धरण तयार करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. हे धरण विकसित करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीचे सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाची मागणी अधिकाऱ्यांनी वनविभागाकडे पत्राद्वारे केली आहे. 

वसई पूर्वेच्या भागात कामण, चिंचोटी, सागपाडा, देवदळ, कोल्ही यासह इतर ठिकाणच्या गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. गावात विहिरी, तलाव, नदी यासारखे स्त्रोत आहेत मात्र तेही योग्य रित्या विकसित केले जात नसल्याने नागरिकांना फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याच्या  समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. तर काही ठिकाणी नागरिक खड्ड्यातून मिळेल तसे पाणी गोळा करतात. यामुळे अनेकदा आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात. यामुळे इथली पाणी समस्या गेल्या काही वर्षांपासून कायम आहे.

या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी याच कामण परिसरातील डोंगर भागातून वाहणाऱ्या देवकुंडी नदीवर धरण किंवा तलाव निर्मिती करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते केदारनाथ म्हात्रे यांनी सुद्धा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात प्रश्न मांडला होता.

या कामण देवकुंडी नदीवर धरण विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या भागात हे धरण उभारण्यात येणार आहे ती जागा तुंगारेश्वर अभयारण्य येत असल्याने त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी वनविभाची परवानगी लागणार आहे. या परवानगीसाठी पाटबंधारे विभागाने संजय गांधी राष्ट्रीय विभाग बोरिवली यांच्याकडे मागणी केली आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर सर्वेक्षण करून हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे असे पाटबंधारे मनोर विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले आहे.

असे होईल सर्वेक्षण 

कामण देवकुंडी नदीचे सर्वेक्षण करण्यासाठी  जवळपास १२ ते १५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यातून तीन ठिकाणी सर्वेक्षण करून आराखडे तयार केले जाणार आहे. त्यात किती पाण्याची साठवण होऊ शकते व याशिवाय आजूबाजूची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन एक आराखडा अंतिम करून पुढील प्रक्रिया राबविता येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

असा होईल फायदा

वसई पूर्वेच्या चिंचोटी ते कामण परिसरात २५ ते ३० गावपाडे आहे. सद्यस्थितीत येथील लोकसंख्या ही एक लाखाहून अधिक झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागते. जवळपास धरण तयार झाल्यास याचा मोठा फायदा या भागाला होईल. तसेच शासनाच्या ६९ गावांची पाणी योजना, घरोघरी नळ योजना अशा योजना त्या प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. याशिवाय पाण्याची खालावलेली पातळी आहे ती सुद्धा व्यवस्थित होण्यास मदत होईल असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. जर देवकुंडी धरण तयार झाले तर येथील गावपाड्यातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. :- केदारनाथ म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते 

धरण तयार करण्यासाठी आधी त्या जागेचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्या सर्वेक्षणाला ना हरकत परवानगी मिळविण्यासाठी वनविभागाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. :- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता,  पालघर पाटबंधारे विभाग मनोर