वसई : नालासोपारा येथे गाजलेल्या प्रवीण धुळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी जेपी सिंग याला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने १६ वर्षानंतर अटक केली आहे. २००९ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे युवा अध्यक्ष प्रवीण धुळे यांच्या हत्येने नालासोपारा हादरले होते.

प्रवीण धुळे (२९) हा नालासोपार्‍याच्या आचोळे येथे राहत होता. तो रिपब्लिकन पक्षाचा वसई तालुका अध्यक्ष होता. त्याचे नालासोपारा परिसरात मोठे प्रस्थ निर्माण झाले होते. भूमाफियांविरोधात त्याने संघटीत होऊन आवाज उठवला होता. दरम्यान, त्याचा राजकीय दबदबा वाढता होता आणि तो विधानसभेची निवडणूक देखील लढविणार होता. त्यामुळे १९ जानेवारी २००९ रोजी प्रवीणची आचोळे येथील कार्यालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सिंकदर शेख आणि अनिल सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र तिसरा आरोपी जे.पी. उर्फ जयप्रकाश कोमल सिंग हा फरार होता. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते.

हेही वाचा…वसई : नायगाव पोलिसांकडून मुख्याध्यापकांना सुरक्षिततेचे धडे

जेपी सिंग हा उत्तरप्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील सरैया या मुळ गावी राहत होता. तेथे पोलिसांचे पथक गेल्यावर तेथून तो गाव सोडून नालासोपारा येथे नाव बदलून राहत असल्याचे समजले. त्याने नालासोपार्‍यातील आपला पत्ता तसेच नाव बदलल्याने त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. पोलिसांनी ४ महिने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्याची माहिती समजली. तो भाईंदरच्या एका चॉकलेट कंपनीत काम करत होता. पोलिसांनी नालासोपारा ते भाईंदर असा पाठलाग करून त्याला अटक केली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितिन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आदींच्या पथकाने या आरोपीला अटक केली.

हेही वाचा…वसई : शाळा महाविद्यालयांची उदासीनता, तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय कागदावरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी बनले भूमाफिया

प्रवीण धुळे हत्या प्रकरणात एकूण ४ प्रमुख आरोपी आहेत. सिकंदर शेख उर्फ सिक्का आणि अनिल सिंग या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. जेपी सिंगला अटक झाली असून अजय सिंग अद्याप फरार आहे. सिंकदर शेख आणि अनिल सिंग हे भूमाफिया असून सध्या जामिनावर आहेत. हे दोघे १० वर्ष तुरुंगात होते. अनधिकृत बांधकामे आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.