वसई- नालासोपारा येथे ४१ अनधिकृत इमारती बांधून चर्चेत आलेला भूमाफिया आणि बविआचा माजी नगरसेवक सिताराम गुप्ता नायगाव मध्ये बेकायदेशीर चाळी बांधत असल्याचे उघड झाले आहे. सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करून तसेच तिवरांच्या झाडांची कत्तल करून बेकायदेशीर चाळी बांधल्या जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील विविध विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या ४१ अनधिकृत इमारतींचे प्रकरण सध्या गाजत आहे. सर्वोच्च न्यायालायने या इमारती बेकायदेशीर ठरवल्यानंतर वसई विरार महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. या ४१ इमारतीत २ हजारांहून अधिक कुटुंबे रहात असून त्यातील रहिवाशी बेघर होणार आहेत. आता पर्यंत ७ इमारती पाडण्यात आल्या असून ८ वी इमारत खाली करण्यात आली आहे. या इमारतींमधील ५० हून अधिक कुटुंबे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या अनधिकृत इमारती बांधणारा भूमाफियास सिताराम गुप्ता याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र रहिवाशी बेघर होत असताना सिताराम गुप्ता मात्र मोकाट असून तो नव्याने बेकायदेशीर चाळी बांधत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक

नायगाव पूर्वेच्या जुचंद्र येथील भूमापन क्रमांक २८३ ही जागा सागरी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) मध्ये येते. ही जागा सिताराम गुप्ता याने विकत घेतली असून त्यावर बेकायदेशीर चाळी बांधत आहे. या पाणथळ जागेवर  मोठ्या प्रमाणवार मातीचा भराव करण्यात आला आहे. चाळी बांधण्यासाठी येथील तिवरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे, अशी तक्रार भाजपाच्या वसई विरार स्लम सेलचे महामंत्री रामअवतार यादव यांनी केली आहे. या ठिकाणी बेकायदेशीर चाळी बांधल्या जात असून, सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन होत आहे याशिवाय तिवरांच्या झाडांची कत्तल होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत मी ८ वेळा महापालिकेकडे ऑनलाईन तक्रारी केल्या आणि ५ वेळा लेखी तक्रारी दिल्या तरी कारवाई झालेली नाही असा आरोप यादव यांनी केला. यापूर्वी प्रभाग समिती (जी) ने येथी १ दुकान आणि १ घरावर कारवाई केली. परंतु उर्वरित बांधकामे सुरक्षित आहे असेही यादव म्हणाले.

हेही वाचा >>> “बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिताराम गुप्ता हा बहुजन विकास आघाडी पक्षाचा माजी नगरसवेक आहे. ४१ बेकायदेशीर इमारतीप्रकरणात २०२३ च्या अखेरिस त्याला अटक झाली होती. परंतु साडेतीन महिन्यातच तो जामिनावर सुटला आणि पुन्हा अनधिकृत बांधकामात सक्रीय झाला आहे, आम्ही या जागेचा पंचनामा केला आहे. पाणथळ जागेवर बेकायदेशीररित्या भराव केल्याचे आढळून आले आहे. आम्ही याप्रकरणी कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे, अशी माहिती मंडल अधिकारी अरूण मुर्ताडक यांनी दिली.