भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील दर्शनीय भागांत महापालिकेने तीन वर्षांपूर्वी एलईडी स्क्रिन उभारले होते. मात्र आता ही स्क्रिन गायब झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्र आणि राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या विविध उपाययोजना मिरा भाईंदर शहरात देखील राबवल्या जातात. त्यामुळे या योजनांची माहिती नागरिकांना मिळावी, याकरिता पालिकेकडून जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जातात. त्यानुसार, सध्या डिजिटल युग सुरू असल्यामुळे नागरिकांना थेट योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने पालिकेने शहरातील प्रमुख ठिकाणी आणि चौकात एलईडी स्क्रिन उभारण्याचा निर्णय घेतला होता.

यात जवळपास दहा स्क्रिन तीन वर्षांपूर्वी शहरात उभारण्यात आले होते. प्रत्येक स्क्रिनची किंमत अडीच लाख रुपयांच्या वर होती. सुरुवातीच्या काही दिवसांत ही स्क्रिन सुरू असल्याचे दिसून आले होते. मात्र, मागील वर्षभरापासून ही स्क्रिन शहरातून गायब झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते जतीन दाधीच यांनी केले आहेत.

म्हणून स्क्रिन हटवले :

मिरा भाईंदर महापालिकेने तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात शहरातील विविध दहा ठिकाणी ही एलईडी स्क्रिन उभारली होती. मात्र या स्क्रिनची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे ती वारंवार खराब होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येत होत्या. दरम्यान, याच काळात काही सायबर भामट्यांनी ही स्क्रिन हॅक करणे सुरू केले. या भामट्यांनी लोकप्रतिनिधींविरोधात आक्षेपार्ह मजकूर दाखवला होता. त्यामुळे संबंधित स्क्रिन बंद करण्याच्या सूचना पोलिसांकडून महापालिकेला दिल्या गेल्या. त्यानंतर ही स्क्रिन महापालिकेच्या गोदामात ठेवण्यात आली असून, नुकतीच ती भंगारात दिल्याची माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.