वसई:- नालासोपाऱ्यात ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहणाऱ्या जोडप्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. दीपक जोगडिया (३५) आणि कांचन सोळंकी ( ३५) अशी या मृतांची नावे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दीपक जोगडिया आणि कांचन सोळंकी हे दोघेही नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील ‘साई महिमा’ इमारतीच्या खोली क्रमांक ४०१ मध्ये राहत होते. २०२२ पासून दोघेही ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये होते. दीपक जोगडीया हा विवाहित होता. त्याला बारा वर्षाचा मुलगा ही आहे. मात्र पत्नी त्याच्यात वाद झाल्याने दीपक हा प्रेयसी कांचन हिच्या सोबत राहत होता.

रविवारी रात्री दोघांनी अचानकपणे दोघांनी राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या जोडप्याने आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे दोघेही मूळचे मुंबई आर्थर रोड परिसरात राहणारे असून सफाई कर्मचारी म्हणून ते काम करतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आत्महत्येच्या घटना

१५ ऑक्टोबर २०२५ – नालासोपारा पश्चिम येथील नाळे गावातील बेणापट्टी भागात ऑक्टोबर महिन्यात एका प्रेमी जोडप्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

१३ ऑक्टोबर २०२५ – प्रियकराने अश्लील छायाचित्रांच्या आधारे केलेले ब्लॅकमेल, वडिलांना महाविद्यालयात केलेली मारहाण यामुळे नैराश्यात गेलेल्या १९ वर्षीय तरूणीने राहत्या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना विरार येथे घडली होती.

६ ऑक्टोबर २०२५ – विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले होते.