वसई: वसई विरार शहरात विविध प्रकारच्या निष्काळजीपणामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नुकताच वसई पश्चिमेच्या शंभर फूटी रस्त्यावर विद्युत वाहक तारेचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे.

वसई विरार शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणच्या भागात वीज वाहिन्या टाकण्यात येत आहेत. याशिवाय ज्या जुन्या झालेल्या वीज वाहक तारा आहेत त्या सुद्धा बदली करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे वसई पश्चिमेच्या शंभर फूटी रस्त्यावर महावितरण कडून विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच तीन ते चार मजूर विजेच्या तारा सरळ करणे व त्या जोडणे अशी कामे करत होते. मात्र, याच तारा कापताना अचानकपणे विद्युत वाहक तारेचा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

यात तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काम करताना विद्युत पुरवठा बंद करणे आवश्यक होते मात्र तो न केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे समजते आहे. महावितरणचा व त्यांनी कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

जेव्हा आम्ही वीजेची तार कापण्याचं काम सुरू केलं. तेव्हा मला सांगण्यात आलं की, विद्युत प्रवाह बंद आहे. त्यामुळे आम्ही तार कापायला घेतली आणि अचानक स्फोट झाला. ज्यामुळे आम्हाला दुखापत झाली आहे अशी प्रतिक्रिया मजुरांनी दिली आहे

सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष

विद्युत संबंधित कामे करीत असताना मजुरांना आवश्यक ती सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मात्र अनेकदा विद्युत संबंधित कामे करताना मजूर व वायरमन यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारचा दुर्घटनांचा धोका संभवतो.

अभियंत्याचे लक्ष कुठे ?

विद्युत वाहिनीचे काम हाती घेतले होते मात्र त्या ठिकाणी विद्युत अभियंता यांनी जागेवर राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे होते. मात्र घटना स्थळी जबाबदार अभियंताच त्या ठिकाणी नसल्याचे समजते आहे.