सुहास बिर्‍हाडे

वसई : ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणलेल्या नालासोपारा येथील ‘विजयी भव’ या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण शुक्रवारी विधीमंडळात गाजले. या प्रकरणानंतर राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्राची चौकशी करून ते सुरू करण्यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ऑगस्ट मध्ये लोकसत्ताने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते.

वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी समाधान गावडे (२८) आणि त्याची मैत्रीण अनुजा शिंगाडे (२६) हे दोघे नालासोपारा येथे ‘विजयी भव’ नावाचे खासगी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालवत होते. मात्र या प्रशिक्षण केंद्रात येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत. १० ऑगस्ट रोजी ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण समोर आणले होते. याप्रकरणी दोन मुलींच्या तक्रार दिल्यानंतर गावडे आणि अनुजा शिंगांडे या दोघांवर विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकसत्ताने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेने या दोघांना सेवेतून निलंबित केले होते. अशा प्रकारे पोलिसांना खासगी प्रशिक्षण केंंद्र चालविण्याचा अधिकार आहे का असाही प्रश्न उपस्थित झाला होता.

हेही वाचा… विरार – वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाला विरोध; अर्नाळा, उत्तन मच्छीमार संघटनांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडले

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी आमदार रवींद्र वायकर आणि आमदार आशिष शेलार यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. हे खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र विनायक पवार या नावाने नोंदणीकृत करण्यात आले होते. मात्र रेल्वे पोलीस कर्मचारी समाधान गावडे त्यात बेकायदेशीरपणे शिकवत होता, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आरोपी गावडे हा पोलीस गणवेशात प्रशिक्षण केंद्राची जाहिरात करून लोकांची दिशाभूल करत होता असेही ते म्हणाले. आरोपीवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणानंतर राज्यात अशा प्रकारे सुरू असलेल्या सर्व खासगी प्रशिक्षण केंद्राची चौकशी केली जाण्याचे निर्देश दिले. तसचे अशी खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

या केंद्रीत आरोपी पोलिसांच्या लैगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित मुलींचे विविध शासकीय योजना आणि निकषांनुसार पुनर्वसन केले जाणार असल्याची घोषणाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा… आता मत्स्य दुष्काळाचे सावट, उत्पादन २५ टक्क्यांवर, कर्जदार मच्छीमारांना चिंता

पीडित मुलींने मानले लोकसत्ताचे आभार

या प्रकरणी तक्रार देणार्‍या पीडित मुलींनी लोकसत्ताचे आभार मानले आहे. लोकसत्ताने दिलेला पाठिंब्यामुळे आम्हाला लढता आले असे त्या म्हणाल्या. थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याने दिलासा मिळाल्याचे या मुलींने सांगितले.

नेमकी तक्रार काय?

पीडित मुलींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी गावडे हा मुलींना अश्लील संदेश पाठवत होता तसेच व्हिडियो कॉल करून अश्लील कृत्य करत होता. कसरत शिकवण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरिराला हेतुपूरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता. अनेकदा मुलींना पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा तसेच त्यांना फिरायला बोलवत होता. त्याची मैत्रीण ही देखील रेल्वे पोलिसात कार्यरत आहेत. तिने देखील या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉटसअप स्कॅन करून आरोपी बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. हा प्रकार असह्य झाल्याने या मुलींनी क्लास मध्ये जाणे बंद केेले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक मुलींनी लैंगिक छळाल्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपी आणि त्याची मैत्रीणीविरोधात विनयभंगाचे कलम ३४५, ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) कलम ८, १२, १७ तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियमाच्या कल् ६६ सी आणि ६७ ए अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.