वाहत्या पाण्यातच निर्माल्याचे विसर्जन झाले पाहिजे असा अनेकांचा अट्टहास असतो. मात्र हाच अट्टहास एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो हे मागील आठवड्यात वसई नायगाव खाडी रेल्वे पुलावर निर्माल्याचा नारळ लागून एका तरुणाचा मृत्यू झालेल्या घटनेने अधोरेखित केले आहे. त्यामुळे निर्माल्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असून भिरकावलेले निर्माल्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई उपनगराला लागूनच वसई विरार शहर आहे. या शहराला विस्तीर्ण असा समुद्र किनारा, डोंगररांगा अशा सर्व बाजूंनी निसर्ग संपन्न असे शहर अशी ओळख आहे. त्यातच येथील नद्या, तलाव आणि खाड्या या सुद्धा येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत. मात्र अलीकडच्या काळात या खाड्यांमध्ये निर्माल्य टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकण्याची एक प्रकारची प्रथाच तयार होऊ लागली आहे. यामुळे आता अपघातांची शक्यता अधिक निर्माण होऊ लागली असून यामुळे ही एक समस्याच ठरताना दिसत आहे. तसेच बंद प्लास्टिक पिशव्या, अनेक दिवसांपासून पिशव्यांमध्ये बंद असणारे निर्माल्य यामुळे, खाडीतील मासे, सूक्ष्म जीव आणि पर्यावरणाला देखील धोका निर्माण होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान वसई- नायगाव खाडी, भाईंदर- नायगाव खाडी आणि वैतरणा खाडी लागते. या खाड्यांमधील वाहत्या पाण्यात आपल्या घरातील निर्माल्य आणून टाकण्याचा अनेकांचा हट्टहास असतो. त्यामुळे या खाडीत धावत्या लोकलमधून निर्माल्य टाकून देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. नायगाव भाईंदर खाडी पूल, वैतरणा विरार खाडी पूल या दरम्यान अनेक प्रवासी निर्माल्याने भरलेल्या पिशव्या धावत्या लोकलमधून भिरकावून देत आहेत. काहीवेळा हे निर्माल्या खाडीत न जाता खाडी पुलावरून पायी प्रवास करणारे व पुलाखालून होडी घेऊन जाणाऱ्या नाविकांच्या अंगावर पडते. यामुळे अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही जण निर्माल्यात घरात जुन्या झालेल्या देवदेवतांच्या मूर्ती, नारळ यासह इतर अवजड साहित्य टाकतात. त्याचा मोठा फटका पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना बसत असल्याचे नागरिक सांगत असतात.
नुकताच पाणजू बेटावरील तीस वर्षीय संजय भोईर या तरुणाच्या डोक्यात निर्माल्यात भिरकावलेला नारळ लागल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घडलेल्या दुर्दैवी घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. त्यामुळे लोकलमधून फेकल्या जाणाऱ्या निर्माल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. यापूर्वी सुद्धा अशा घटना घटना घडल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी वैतरणा खाडीवरून निर्माल्याचा नारळ एका महिलेच्या डोक्यात लागून ती गंभीररीत्या जखमी झाली होती.
सातत्याने अशा घटना समोर येत असतानाही प्रशासनाकडून याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. निर्माल्य फेकणाऱ्यांना त्यांचे निर्माल्य खाडीत फेकल्याचे समाधान वाटत असले तरी तेच निर्माल्य एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो याचा विचारच होत नाही. त्यामुळे आजही निर्माल्याने भरलेल्या पिशव्या या धावत्या लोकलमधून खाडीत टाकून दिल्या जात आहेत. अनेकदा या बंद पिशव्या खाडीतून वाहत जाऊन वसईतील अनेक समुद्रकिनारी पडून राहतात. किनाऱ्याची स्वच्छता करताना हे निर्माल्य पुन्हा कचऱ्यात जाते.
ठोस उपाययोजना हव्यात
निर्माल्य टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्माल्य टाकणाऱ्याचा शोध घेणे हे मोठे आव्हान जरी असले तरी ते जनजागृतीद्वारे शक्य आहे. यासाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासन यांनी संयुक्त रित्या यावर उपाययोजना आखायला हव्यात. नागरिकांना खाडीच्या प्रदूषणासंबंधी आणि निर्माल्य फेकण्याच्या दुष्परिणामांविषयी समाजमाध्यमातून माहिती द्यावी. याशिवाय जे खाडीमध्ये निर्माल्य फेकण्याच्या घटनांची त्वरित तक्रार नोंदवून वेळोवेळी कारवाई सुरू झाली तर निर्माल्य टाकणाऱ्यांना धाक राहील. अन्यथा अशा प्रकारच्या निर्माल्याचा धोका कायम राहील.
निर्माल्य कलशांचा वापर होण्याची गरज
अनेकांना आपल्या घरातील निर्माल्य खाडीत किंवा नदीत विसर्जन करायचे असते. मात्र अशावेळी इतरांचाही विचार होणे आवश्यक आहे. अनेकदा खाडीत फेकलेल्या बंद पिशव्या खाडीतून वाहत जाऊन वसईतील अनेक समुद्रकिनारी पडून राहतात. किनाऱ्याची स्वच्छता करताना हे निर्माल्य पुन्हा कचऱ्यात जाते. तसेच निर्माल्य असणाऱ्या पिशव्या वेळीच उचल्या गेल्या नाहीत तर बंद पिशवीत फुले कुजून जातात. मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या सुविधेसाठी आणि खाडी किनारे स्वच्छ रहावे यासाठी वसई विरार पालिकेकडून अनेक खाडी किनारी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. यात निर्माल्य टाकण्याची सोय करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर निर्माल्याचे संकलन केले जाऊन त्यापासून नैसिर्गिक खतनिर्मिती केली जाते. निर्माल्य बंद पिशव्यांमधून खाडीत न टाकता निर्माल्य कलशात टाकले तर त्यापासून निर्माण होणाऱ्या खताचा वापर पुन्हा झाडांसाठी आणि पर्यायाने पर्यावरणाला होणार आहे.
खाड्यांमध्येही वाढते प्रदूषण
खाडीमध्ये ही मोठ्या प्रमाणात निर्माल्य फेकले जाते. काही वेळा हे निर्माल्य प्लास्टिक पिशवीसकट वसई खाडीत फेकतात, यामुळे खाडीचे प्रदूषण होत आहे आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम देखील होत आहेत.भरतीच्या वेळी वसई तालुक्यातील गजबजलेल्या समुदकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, व इतर कचरा जमा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. वसईच्या भागात खाडीच्या परिसरात स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात. याच मासेमारीवर येथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. विशेष करून या खाडीच्या पाण्यात बोय मासा, खाजरी, कोळंबी, काळे मासे, मोरी यासह विविध प्रकारच्या प्रजातीचे मासे आढळून येतात. मात्र मच्छिमारांना मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात निर्माल्य,प्लास्टिक व इतर कचरा येत असल्याने त्यांना ही याचा फटका बसत आहे. याशिवाय या प्रदूषणाचा मोठा परिणाम खाडीत असलेल्या माशांवर आणि सूक्ष्म जीवांवर होऊ लागला आहे.
खाडी संवर्धनाची गरज…..
खाडीतील पात्रात विविध प्रजातीचे मासे आहेत. माश्यांची एक प्रजाती ही साधारपणे हजार ते लाखोंच्या संख्येने अंडी घालीत असते. तसेच या प्रजातीच्या वाढीसाठी पोषक वातावरण गरजेचे आहे. परंतु सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यातील बहुतांश खाड्यांच्या पात्रात दुर्गंधीयुक्त सांडपाणी, प्लास्टिक ,केरकचरा, निर्माल्य यातून प्रदूषण तयार होत असते या प्रदूषणामुळे माशांची वाढ होत नाही किंवा त्यांची प्रजाती तयार होण्यापूर्वीच मृत होतात. हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर खाड्यांच्यासुरक्षेसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे यामुळे खाडी भागांचे संवर्धन करता येणे शक्य होणार आहे.