शहरातील उद्याने ही शहर सौंदर्य व नागरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र त्या उद्यानांची देखभाल करण्याऐवजी त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. उद्यानात बसविण्याची खेळणी चक्क स्मशानभूमीत बसविणे, उद्यानांमध्ये खेळण्यांचे साहित्य ठेवून अतिक्रमण करणे अशा विविध कारणांमुळे पालिकेची उद्यानांच्या देखभालीसाठीची उदासीनता अधोरेखित होऊ लागली आहे.

वसई विरार शहरातील वाढत्या विकासाकामांमुळे  शहरातील मोकळ्या जागा नष्ट होऊ लागल्या आहेत. यात खेळाची मैदाने आणि उद्याने यासाठी म्हणून आरक्षित असेलल्या जागाही गिळंकृत होत आहेत. मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना फिरण्यासाठी मोकळ्या जागाच शिल्लक राहिल्या नसल्याने आता पालिकेने तयार केलेली उद्याने ही एकमेव आधार राहिला आहे. मात्र त्या आधाराकडे पालिका गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शहरात उद्यानांच्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शहरात आधीच उद्याने कमी, त्यात असलेल्या उद्यानांची दुरवस्था यामुळे कर भरूनही नागरिकांना मोकळ्या जागांचा आणि निसर्गाचा आनंद घेता येत नाही. गजबजलेल्या शहरात नागरिकांना विरंगुळ्यासाठी या सार्वजनिक उद्यानांचाच आधार असतो. वसई विरार शहरात महापालिकेची १६२ उद्याने असली तरी त्यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. अनेक मैदानात अतिक्रमणे झाली असून उद्यानातील साहित्याची मोडतोड झालेली आहे. अनेक उद्यानात तर चक्क भूमाफियांनी कब्जा केला आहे. त्यामुळे पालिकेची उद्याने ही केवळ कागदावरच जिवंत असलयाचे दिसून येत आहे.

नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. उद्याने आणि मैदाने ही शहराची फुफ्फुसे मानली जातात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना विरंगुळ्यासाठी मैदानाचा फायदा होत असतो. उद्यानातील झाडे शहराची शोभा वाढवतात आणि आवश्यक असलेला प्राणवायू निर्माण करत पर्यावरणाचा समतोल साधत असतात. पालिकेच्यान नोंदीनुसार १६२ उद्याने असली तरी प्रत्यक्षात उद्यानांची संख्या कमीच असल्याचे आढळून आले आहे.

शहरातील काही उद्याने वगळता बहुतेक सर्व उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. उद्यानातील खेळण्याचे साहित्य तुटलेले असून व्यायामासाठी लावण्यात आलेल्या साहित्यांना गंज चढला आहे. बसण्यासाठी पुरेसी बाके नाहीत. उद्यानांची स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र कचरा पडलेला असतो. उद्यानांच्या साफसफाईचा आणि देखभालीचा ठेका महिला बचत गटांना देण्यात आलेला आहे. परंतु काही ठिकाणी त्यांच्याकडून योग्य निगा राखली जात नाही. उद्यानात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधार असतो. त्यामुळे संध्याकाळनंतर नागरिकांना उद्यांनात थांबता येत नाही. याचा फायदा नशेबाज आणि प्रेमी युगुले घेत असतात.

नालासोपारा येथील प्रभाग समिती ड च्या अंतर्गत येणार्‍या उद्यानात तर ठेकेदाराने राडारोडा टाकलेला आहे. मागील वर्षी पालिकेने हे उद्यान गणपती मूर्तीविक्रीसाठी मूर्तीकारांना भाड्याने दिलेले असल्याचा प्रकार समोर आला होता. उद्यानांची देखभाल आणि दुरूस्ती करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जातात. मग हा निधी जातो कुठे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी वसई विरार महापालिकेच्या नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले होते. पालिकेच्या उद्यान विभागाने वसई पश्चिमेच्या बेनापट्टी स्मशानभूमीतच चक्क खेळण्याचे आणि व्यायामाचे साहित्य बसविण्याचा प्रताप पालिकेने केला होता. स्मशान ही दु:खाची जागा मानली जाते. अशा ठिकाणी मनोरजनांची साधने लावून पालिकेने नागरिकांच्या भावनांशी खेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली होती. या घटनेनंतर तरी पालिकेने धडा घ्यायला हवा होता. मात्र एक प्रकरण ताजे असतानाच वसईतील समतानगर येथील महापालिकेच्या चिमाजी आप्पा उद्यानात ठेकेदाराने लहान मुलांची खेळणी तसेच व्यायामाचे सामान ठेवून एका प्रकारे गोदाम तयार करून ठेवले आहे. या साहित्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी जागा उरली नसल्याने मुलांनी खेळायचे तरी कसे असाच काहीसा प्रश्न निर्माण होत आहे. उद्याने ही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने त्या ठिकाणी योग्य ती निगा राखणे, तेथील साहित्यावर देखरेख करणे, उद्यानात घडणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालणे अशी जबाबदारी पालिकेची आहे मात्र त्याबाबत पालिका उदासीनच असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. पालिकेच्या दप्तरी असलेल्या उद्यानांचे नूतनीकरण करावे. त्यातील अतिक्रमण हटवावीत आणि साहित्याची डागडुजी करून उद्याने नागरिकांना खुली करणे काळाची गरज बनली आहे.

उद्यानात भूमाफियांचा कब्जा

अनेक उद्यानात भूमाफियांनी कब्जा करण्यास सुरुवातच केली आहे. भंगार साहित्य आणून टाकण्यात आली आहेत. अनेक उद्यानात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे मैदानाचे क्षेत्रफळ कमी झाले आहेत. अशाप्रकारे हळूहळू मैदानावर कब्जा करण्याचा भूमाफियांचा प्रयत्न आहे. महापालिका अधिकारी त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

योग्य रित्या देखभाल हवी

उद्यानात अनेकदा खेळण्यांची साहित्य खेळताना तुटून जातात. मात्र तरीही काही लहान मुले अशा साहित्यावर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या साहित्याचा फटका लागून दुखापत होण्याची शक्यता असते. अशा घटना रोखण्यासाठी तुटलेले साहित्य वेळीच बदलणे किंवा वेळीच काढून टाकणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे पथदिव्यांच्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांमुळेही अपघात होण्याची शक्यता असते. त्याचीही वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे.