वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही वाहिन्यांवर कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू होताच या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग ही फारच मंदावला आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजल्या पासूनच मुंबई- ठाणे दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
वर्सोवा पूल, ससूनवघर, ससूपाडा, मालजीपाड्या पासून नायगाव , वसई पर्यँत वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यँत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे काहींनी विरुद्ध दिशेने वाहने काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे या कोंडीचा परिणाम नंतर गुजरात वाहिनीवर दिसून आला.
दोन्ही वाहिन्यांवर कोंडी निर्माण झाल्याने मागील तीन ते चार तास प्रवाशांना या कोंडीत अडकून राहावे लागले. त्यामुळे ठाणे व मुंबई च्या दिशेने कामावर निघालेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले. महामार्गावर खड्डे प्रचंड आहेत. त्यामुळे वाहनांची गती कमी होते त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत आहे असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
घोडबंदर येथील गायमुख जवळ खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनांची गती कमी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागील तासांपासून वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.