वसई:- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा बरखास्त करण्यात आली असून गुन्हे शाखेडून भरोसा कक्ष काढून घेण्यात आला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखे यापुढे कक्ष-४ म्हणून ओळखली जाणार आहे. याशिवाय लवकरच पोलीस ठाण्याच्या प्रमुख्यांच्या अंतर्गत बदल्या देखील केल्या जाणार आहेत.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. आयुक्तालयात एकूण ३ परिमंडळ असून. पोलीस ठाणी आहेत. निकेत कौशिक यांनी तिसरे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. कौशिक यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यास सुरवात केली आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत भाईंदर आणि वसईत एकूण दोन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा होत्या. देहविक्रीत्या व्यवसायातील मानवी तस्करी रोखून वेश्याव्यवसायावर कारवाई करणे हे त्यांचे प्रमुख काम होते. डान्स बार, मसाज पार्लर, स्पा, आदी ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात येत होती. मात्र भाईंदर मध्ये या शाखेचे डान्सबार मध्ये लागेबांधे उघडकीस आले. त्यांनतर अनेक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे ही शाखाच बरखास्त करण्यात आली.
भाईंदर मधील अनैतिक वाहतूक शाखेचे प्रभारी देवीदास हांडोरे यांची मांडवी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. ही कामे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष स्थापन
भरोसा कक्ष पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून त्या ऐवजी महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महिला गुन्ह्यांचा आढावा घेऊन दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणे, अपराध सिध्दता वाढविण्यासाठी उपायायोजना करणे, विशिष्ट सोपविण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे आदी कामांचा समावेश आहे. या कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असेल. त्यात ३ अधिकारी आणि १४ पोलीस कर्मचार्यांचा समावेश असणार आहे.
मध्यवर्ती शाखेचे नामकरण गुन्हे शाखा ४
आयुक्तालयात एकूण ३ गुन्हे शाखा, एक मध्यवर्ती गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक अशा शाखा होत्या. गुन्हे शाखा १ मिरा भाईंदर परिमंडळात तर २ आणि ३ शाखा या वसई विरार मध्ये कार्यरत होत्या. मध्यवर्ती गुन्हे शाखेची हद्द संपूर्ण आयुक्तालय होती. मात्र कामात सुसूत्रता आणण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे नामकरण गुन्हे शाखा-४ असे करण्यात आले आहेत.