वसई: पत्नीने घर सोडल्यानं नैराश्यग्रस्त झालेल्या पतीने थेट ‘शोले’ चित्रपटातील वीरूप्रमाणे पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे हा नाट्यमय प्रकार घडला.या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत त्याला सुखरूप खाली उतरवले.
सुरज सैनिक असे व्यक्तीचे नाव आहे. तो पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम करतो. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने वारंवार मारहाणीला कंटाळून त्याला सोडले होते. त्यामुळे सुरज नैराश्यात गेला होता.
बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने आचोळे पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईलने पत्नीला परत यावे, अशी मागणी करत आत्महत्येचा इशारा दिला. यावेळी त्याने थेट पत्नीला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. घाबरलेल्या पत्नीने तातडीने आचोळे पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुरजला संयमाने खाली उतरवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.