वसई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना वसईच्या मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. वसई पूर्वेतील मराठा बांधवांनी ‘एक घर एक शिदोरी’ हा उपक्रम राबवून आंदोलकांना अन्न आणि पाण्याची मदत पोहोचवली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकांसारख्या परिसरातही आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागांतून त्यांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

वसईतील मराठा बांधवांनी देखील मुंबईत सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलकांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा करता यावा म्हणून वसई पूर्वेतील वालीव आणि भोयदापाडा येथील मराठा बांधवांकडून ‘एक घर एक शिदोरी’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल ३ हजार चपात्या, पिठलं, ठेचा आणि लोणचे तयार करण्यात आले. यासोबतच ३ हजार ५०० पाण्याच्या बाटल्या जमा करून मुंबईतील आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या असल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली आहे.