वसई: वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून चित्रीकरणासाठी गेलेल्या तरुणाला हिंदी भाषिक सुरक्षारक्षकाने अडविल्याने वाद निर्माण झाला. या प्रकाराबाबत मराठी एकीकरण समिती सुद्धा आक्रमक झाली असून महाराष्ट्रातील गडकिल्ले व अन्य प्रेक्षणीय ठिकाणी मराठीच सुरक्षारक्षणकांची नियुक्ती करावी अशी मागणी समोर येत आहे.

दिवाळीच्या निमित्ताने बुधवारी सकाळच्या सुमारास एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्रीकरणासाठी वसई किल्ल्यावर गेला होता. मात्र तेथील हिंदी भाषिक सुरक्षारक्षकाने त्याला अडवत चित्रीकरण करण्यास मनाई केली. यावरून वाद निर्माण झाला होता. सुरक्षाकाला त्या तरुणाने समजविण्याचा प्रयत्न केला असता. त्या सुरक्षा रक्षकाने मला मराठी येत नसल्याचे सांगत हिंदी भाषेतूनच बोलणार असे सांगितले.

 यावरून त्या तरुणाने सुरक्षा रक्षकांना मराठी येत नसल्याची बाब लक्षात आणून देत त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सगळ्या घडलेल्या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मराठी एकीकरण समिती सुध्दा आक्रमक झाली आहे. या घडलेल्या प्रकारचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात राहून वारंवार मराठी भाषेची गळचेपी होत आहे. महापुरुषांचा सुद्धा आदर केला जात नाही असे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील सर्वच गड किल्ले, महापुरुषांची स्मारके, संग्रहालये व अन्य प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी मराठी भाषिक सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. याशिवाय जे सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केले जातील यांना तेथील स्थळांचे महत्त्व माहीत असणार असणे रक्षक असणे आवश्यक आहे असावे असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले आहे. शासनाने यावर निर्णय घेतला नाही तर याबाबत राज्यभर मोहीम सुरू करून आंदोलन केले जाईल असा इशारा ही मराठी एकीकरण समितीने दिला आहे.