Nalasopara Garment Shop Fire विरार : नालासोपारा पूर्वेच्या चंदननाका परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेच्या अग्निशमन विभागाला यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नालासोपारा पूर्वेला असणाऱ्या चंदननाका परिसरात असणाऱ्या आयेशा अपार्ट्मेंटमधील एका कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागली.

कपड्यामुळे काही क्षणातच आगीचा भडका होऊन आग पसरण्यास सुरुवात झाली. यावेळी आगीची माहिती वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एका दुकानाला लागलेली आग पसरल्याने शेजारच्या दोन दुकानांनाही आग लागली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र यात दुकानातील सर्व माल जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापूर्वी सुद्धा शहरात आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.