वसई : वसई विरार शहरात ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेले आगींचे सत्र अजूनही सुरूच आहे. दिवाळीच्या काळात २० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असतानाच नालासोपाऱ्यात पुन्हा एकदा गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पश्चिमेत बहुजन विकास आघाडीचे कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या कार्यालयानजीकच्या एका बंद इमारतीत  आग लागल्याची घटना घडली.  आग भीषण असल्यामुळे इमारतीतून निघणारे धुराचे मोठे लोट सर्वत्र पसरले होते. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आग लागलेल्या या इमारतीमध्ये शीतपेयांचे (कोल्ड्रिंक्स) मोठे गोदाम होते. या गोदामात मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा साठा करण्यात आला होता. शीतपेयांच्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर साठवलेल्या वस्तूंमुळे  वेगाने आग गोदामात पसरली. त्यामुळे धुराचे लोट दूरवर दिसत होते.

वाढती आग पाहून स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवली. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण, आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

सुदैवाने, ही इमारत बंद असल्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोदामातील शीतपेयांचा साठा व अन्य साहित्य जळाल्याने गोदाम मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.