भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात रस्त्यावर थुंकल्यास, लघुशंका केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास आता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर स्वच्छता पथके तैनात केली आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सुमारे ३ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये मिरा भाईंदर महापालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणे, जनजागृती करणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे यामुळे हे यश महापालिकेच्या पदरात पडले आहे.

या यशानंतर शहरातील स्वच्छतेत अधिक भर घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला आहे. शहरातील रस्ते, मोकळी मैदाने आणि चौक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी प्रभाग स्तरावर स्वतंत्र स्वच्छता पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, महापालिकेच्या सहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच कर्मचाऱ्यांचे असे स्वच्छता पथक तैनात केले जाणार आहे. यापूर्वीही अशा प्रकारची पथके तैनात करण्यात आली होती, मात्र त्यावेळी मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती. प्रामुख्याने ही पथके रस्त्यावर थुंकणारे, लघुशंका करणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करतील. यामध्ये थेट दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.