वसई: वसई-विरार महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाला आहे. शहरातल्या नऊ प्रभागांत सर्वाधिक ५ हजारांवर अधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या हरकतीची शहानिशा करून दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने तात्काळ समिती स्थापन केली आहे

वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार प्रारूप आराखडा आणि महिला आरक्षण सोडत असे दोन टप्पे पूर्ण झाले होते.

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या याद्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या याद्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ झाल्याचं समोर आलं होतं. मतदार याद्यांमधून हजारो मतदारांची नावे वगळल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने  प्रसिद्ध केले होते.

मतदारांची नावे वगळण्याबरोबर अनेक प्रभागात अचानकपणे मतदारांची वाढ करण्यात होती. अनेक मतदारांची नावे मूळ प्रभागातून काढून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली होती. यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला होता. मतदार यादींवर हरकती नोंदवण्यासाठी ३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पालिकेकडे नऊ प्रभागांतून ५ हजार ३२ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २ हजार ९२३ हरकती या प्रभाग समिती डी ( नालासोपारा पूर्व- आचोळे) येथे आल्या आहेत. सर्वात कमी म्हणजे १५ हरकती या प्रभाग समिती आय मध्ये नोंदवण्यात आल्या आहेत.

पालिकेची विशेष समिती

एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्रारूप मतदार यादीवर हरकती येतील याची पालिकेने कल्पना केली नव्हती. या हा गोंधळ निस्तरण्यासाठी तसेच आलेल्या हरकतींची खातरजमा करून त्याची दुरुस्त करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय समिती स्थापन केली आहे. प्रत्येक प्रभागात साहाय्यक आयुक्त, अभियंता आणि निरीक्षक अशा तीन जणांचा या समितीत समावेश आहे. ७ जुलैपर्यंत या हरकतीची शहानिशा झाल्यानंतर दुरुस्ती करून त्या महापालिकेला सादर करण्यात येईल. त्यानंतर सुधारित प्रारूप यादी राज्य निवडणूक आयोगात सादर करण्यात येईल.  ९ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पालिकेची उपायुक्त (निवडणूक) किशोर गवस यांनी दिली.

कुठल्या प्रभागात किती हरकती?

प्रभाग                हरकती

अ ( बोलींज)          ३१३

ब ( विरार पूर्व)         ४९४

सी ( चंदनसार)        ६२

डी ( आचोळे)    २९२३

ई ( नालासोपारा प)       ४२

एफ ( धानिव)   ५०९

जी (वालीव);    ६२९

एच ( नवघर माणिकपूर) २१

आय    २१