वसई : कोकण मंडळाने विरारच्या बोळींजमधील म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी केल्याने घरे बघण्यासाठी रविवारी नागरिकांची झुंबड उडाली आहे. मात्र यापूर्वी ज्यांनी सोडती मध्ये घरे खरेदी केली आहेत ते रहिवासी चांगलेच संतप्त झाले आहेत. म्हाडाने आमची एकप्रकारे फसवणुक केली असून आम्हालाही सवलत देऊन आमची रक्कम परत करा अशी मागणी केली आहे.

कोकण मंडळाने विरार पश्चिमेच्या बोळींजमध्ये सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारला आहे. मात्र यात घरांचा दर्जा, अपुऱ्या सोयी-सुविधा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पातील हजारो सदनिका विक्रीविना रिक्त पडून आहेत. या प्रकल्पातील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून येथे अनेक समस्य असल्याने घरे विकली जात नाहीत. त्यामुळे म्हाडाने न्यू सातारा बँकेच्या साहाय्याने योजना राबवून त्या सदनिका विकण्याचा निर्णय घेतला आहे. सदनिकांच्या किंमती १५ टक्कयाने कमी केल्या आहेत. वन बीएचके हा २० ते २५ लाखात तर टू बीएचके हा ३५ ते ३६ लाख रुपयांना विकण्यात येणार आहे. सुरवातीच्या दरापेक्षा ५ ते ६ लाख रुपयांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत. सवलतीच्या दरात सदनिका मिळत असल्याने आता या ठिकाणी घर घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घरे बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

हेही वाचा : शहरबात : छडी वाजे छम छम…

u

म्हाडाचे रहिवासी संतप्त

यापूर्वी जास्त किंमत देऊन ज्यांनी घरे खरेदी केली आहेत त्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. रविवारी म्हाडा संकुल संकुलात निषेध सभा पार पडली. यावेळी म्हाडा प्रशासनाने आम्हाला फसविले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. आम्ही वन बीएचके हा २५ ते ३० लाखात तर टू बीएचके का ४० ते ४५ लाख रुपयांना घेतला होता. आता घरे कमी किंमतीत विकली जात असून ती आमची एकप्रकारे ही फसवणूक असल्याा आरोप रहिवाशांनी केला आहे. इतरांना जी सवलत दिली जाते ती आम्हाला देण्यात यावी असे श्वेता साळुंखे आणि दिनकर जाधव यांनी सांगितले सर्व सुविधा व सोसायटी बनत नाहीत तोपर्यंत सेवाशुल्क माफ व अतिरिक्त सेवाशुल्क भरले जाणार नाही असे कृष्णा देवाडिगा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : वसईत नाताळनिमित्ताने रंगले ख्रिसमस कार्निवल, शोभायात्रांमधून नाताळ जल्लोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सवलतीबाबत विचार सुरू- म्हाडा

सोडतीत घरे विकली जात नसल्याने न्यू सातारा आणि पारिजात यांना ही घरे विक्रीसाठी दिली आहेत. त्यांनी एक गठ्ठा शंभर घरे विक्री केली तरच त्यांना ही सवलत लागू राहणार आहे. सोडती मध्ये घरे लागलेल्या जुन्या रहिवाशांनी सवलत मागितली आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा सुरू असून वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील असे कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.