भाईंदर :- मिरा भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या स्वागतासाठी झाडांना चक्क खिळे मारून जाहिरात फलक लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शनिवारी मिरा भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मिरा रोड येथील आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले. मात्र काही ठिकाणी हे फलक बेकायदेशीररीत्या लावल्याचेही दिसून आले.
धक्कादायक बाब म्हणजे, आप्पासाहेब धर्माधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडांवर थेट खिळे ठोकून फलक लावण्यात आले होते. खुद्द वनमंत्र्यांच्या स्वागतासाठी झाडांवर खिळे मारण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.काहींनी प्रत्यक्ष घटनास्थळीच पोलिसांकडे तोंडी तक्रार नोंदवली.
दरम्यान, प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सुरू असतानाच हे फलक तातडीने काढून टाकले.
