भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात असलेल्या अत्याधुनिक वाहनांचा वापर प्रशासन रस्ते धुलाईसाठी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला बळकट करण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने महालिकेच्या प्रभाग स्तरावर उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्रात उभी केली जातात. सदर वाहनांच्या मदतीमुळे आगीच्या मोठ्या दुर्घटना देखील नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे. मात्र आता या वाहनांचा वापर आग विझवण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत करण्याऐवजी स्वच्छतेच्या कामासाठी केला जात असल्याची बाब समोर आली आहे. यात या वाहनांचा वापर रस्त्यावरील दुभाजक आणि उड्डाण पुलावरील पत्रे साफ करण्यासाठी केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मिरा भाईंदर शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच दुभाजक व उद्यानाच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील अग्निशमन विभागातील वाहने आणि कर्मचारी रस्ते धुलाईचे काम करताना दिसत आहेत. शासन आदेशानुसार अग्निशमन ताफ्यातील वाहनांचा व साहित्याचा वापर आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी करू नये असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र असे असताना देखील महापालिकेकडून सर्रासपणे वारंवार या गाड्यांचा वापर रस्ते धुलाईच्या कामासाठी केला जात आहे. तर वरिष्ठांच्या आदेशानुसारच गाड्यांचा वापर केला जात असल्याचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले आहे.