भाईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिकेने खरेदी केलेल्या रुग्णवाहिका वापराविना पडून असल्याची बाब समोर आली आहे. या वाहनांच्या दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या भंगार अवस्थेत येऊ लागल्या आहेत. त्यामुळे यासाठी केलेला खर्च ही वाया गेला आहे.
मिरा भाईंदर महापालिकेने शहरात रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण २१ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत, ज्यामध्ये ४ शववाहिकांचा देखील समावेश आहे. या वाहनांसाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यानुसार, भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात तसेच मिरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात या रुग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, शहरातील सहा प्रभाग कार्यालयांमध्येही प्रत्येकी एक रुग्णवाहिका उभी करण्यात आली आहे.
मात्र, मागील काही महिन्यांपासून या रुग्णवाहिकांच्या नियमित दुरुस्ती कडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वापराविना पडून असलेल्या या रुग्णवाहिका आता भंगार अवस्थेत गेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना त्यांचा उपयोग करणे शक्य नाही.
महत्वाची बाब म्हणजे, या रुग्णवाहिकांच्या जबाबदारीवरून महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि वाहन विभाग यांच्यात वाद निर्माण झाला आहे. परिणामी वाहनांची मोठी दुरवस्था झाली असून नागरिकांच्या कर रुपी पैशाचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार भाजप नेते रवि व्यास यांनी केली आहे. तर नुकतेच या वाहनांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
