भाईंदर : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाही, मिरा भाईंदर महापालिकेकडून पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे धोरण विसंगत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली आहे. मिरा भाईंदर महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे धोरण निश्चित केले असून, ‘बाप्पा माझा – शाडूचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अधिकाधिक नागरिकांनी पीओपी मूर्तीऐवजी शाडू मातीपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रोत्साहन मिळावे म्हणून जनजागृती करण्यावर भर देण्याचा निर्धार महापालिकेने केला होता. याशिवाय, शहरातील मूर्तिकारांना सवलतीच्या दरात शाडू माती उपलब्ध करून देणे तसेच विक्रेत्यांना सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्याची घोषणाही प्रशासनाने केली होती. विशेष म्हणजे, जनजागृतीसाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद देखील करण्यात आली होती. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने पीओपी मूर्त्यांवरील बंदी उठवण्याचे आदेश जारी केले.

परिणामी, यंदा पीओपी मूर्तींचा पुन्हा वापर होण्याची शक्यता आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबतची जनजागृती मोहीम थंडावलेली दिसून येत आहे. तसेच, सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही मूर्तिकारांना शाडू माती व विक्रेत्यांना सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्यासारखी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे धोरण आणि कृती यामध्ये विसंगती असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती आणि इतर कामे सुरळीत सुरू असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही मागील सात वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून विविध मार्गाने प्रयत्न करत आहोत. यासाठी महापालिकेच्या मदतीची देखील मोठी अपेक्षा आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यात कोणताही रस दिसून येत नाही. शाडू मातीची उपलब्धता करून देण्यासारखे मूलभूत कामदेखील प्रशासनाने केलेले नाही.” हसमुख गेहलोत -पर्यावरणपूरक गणेशोत्सव चळवळकर्ते.