भाईंदर :आर्थिक अडचणीमुळे उद्यानांची देखभाल करणे कठीण झाल्याने घोडबंदर येथील पद्माली उद्यान व तलाव खासगी संस्थेकडे चालवण्यासाठी देण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

घोडबंदर येथे असलेला जुना तलाव व त्याच्या सभोवतालचा परिसर महापालिकेने विकसित करून त्याला ‘पद्माली’ असे नाव दिले आहे. याठिकाणी असलेले मंदिरही महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून हे उद्यान बंद ठेवण्यात आले होते.

सदर उद्यान सुरक्षेसाठी तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, माळी आणि इतर कामगारांची नियुक्ती करावी लागते. मात्र, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होत नव्हते. परिणामी प्रशासनाने उद्यान बंद ठेवले होते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी गैरसोय होत होती.

या पार्श्वभूमीवर, उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घोडबंदर ग्रामस्थ उत्सव मंडळाकडे ते देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, ९ जून २०२५ रोजी महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार संस्थेसोबत करारनामा करण्यात आला असून, उद्यान नागरिकांसाठी विनामूल्य सुरू ठेवण्याची अट करारात घालण्यात आली आहे.

तर शहरातील उद्याने आणि दुभाजकांची खासगी संस्थांच्या मदतीने देखभाल दुरुस्ती करण्याचे धोरण २८ जून २०१६ मंजुर करण्यात आले असून त्यावरून हा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वादग्रस्त निर्णय ठरण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरा-भाईंदर शहरात महापालिकेची सुमारे ९० उद्याने आहेत. सध्या या सर्व उद्यानांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडेच आहे. मात्र, घोडबंदर येथील उद्यान खासगी संस्थेला देण्यात आल्याने इतर ठिकाणीही अशा स्वरूपाच्या मागण्या होण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असून, हा निर्णय भविष्यात वादग्रस्त ठरू शकतो.