भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतून होणारी धोकादायक प्रवासी वाहतूक टाळण्यासाठी अखेर महापालिकेने उपाययोजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बस मार्गांचा फेरआढावा घेऊन गर्दीच्या ठिकाणी बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मिरा भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा असून ती खासगी कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जाते. सध्या महापालिकेच्या ताफ्यात ७५ डिझेल व ५५ इलेक्ट्रिक अशा एकूण १२९ बसगाड्या आहेत. या बसगाड्या मुंबई, ठाणे आणि मिरा भाईंदर अंतर्गत मिळून २६ मार्गांवर धावतात. यामधून दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार बस प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये प्रवास करू लागल्याने अनेकदा प्रवासी दरवाज्यावर लटकून धोकादायक प्रवास करतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला होता. यासंदर्भात प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापूर्वी बसमध्ये चढताना किरकोळ अपघात झाल्याच्या नोंदीही आहेत. त्यामुळे या त्रुटी भरून काढण्यासाठी नव्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी परिवहन विभागाला बस मार्गांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या मार्गांवर प्रवासी संख्या कमी आहे, तेथील फेऱ्या कमी करून, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.या शिवाय पंतप्रधान अनुदान योजनेतून महापालिकेला नव्या १०० इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार असून, यामुळे गर्दीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली आहे.