भाईंदर: मिरा भाईंदर शहरातून निघणाऱ्या ई- कचऱ्याच्या ( इलेट्रॉनिक) विल्हेवाटाची महापालिकेने कोणतीही सोय केलेली नाही. परिणामी हा कचरा शहरात विविध ठिकाणी अनेक वर्षांपासून पडून राहत असून प्रदूषण पसरवत आहे.

मिरा भाईंदर शहरात प्रति दिवस साडे चारशे टन इतका कचरा निघतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उत्तन येथे घन कचरा प्रकल्प उभारला आहे. मात्र या ठिकाणी ओला व सुक्या कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते.परिणामी ई- कचरा आणि जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.त्यामुळे हा कचरा केवळ वेगळा केला जात असला तरी तो तसाच ठेवला जात आहे.

प्रामुख्याने या कचऱ्यात शिसे, कॅडमियम, पारा, निकेल यांसारख्या धातूंबरोबरच अनेक विषारी रसायने असतात.याला कचरा प्रकल्प स्थळी टाकल्यास त्यातील धातू व रसायन भूजलामध्ये मिसळून पर्यावरणासह मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो.म्हणूनच नियमांनुसार ई-कचऱ्याचे लँडफिलिंग करण्यास सक्त मनाई आहे.त्यामुळे या कचऱ्यावर विल्हेवाट लावण्यासाठी स्वातंत्र्य केंद्र उभारण्याची मागणी पर्यावरण प्रेमीकडून करण्यात आली आहे. तर याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नुकतेच निर्देश मिळाले असून त्या दृष्टीने पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेकडे आतापर्यंत किती टन ई-कचरा संकलित झाला आहे, याची नोंद उपलब्ध नाही आहे.ई-कचरा (व्यवस्थापन) नियम, २०२२ नुसार ई-कचरा १८० दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. तसेच शहरात सार्वजनिक ठिकाणी ई-कचऱ्यासाठी संकलन केंद्र स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत याकडे दुर्लक्ष केले जात आहे.