भाईंदर :- भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा शनिवारी मिरा भाईंदरमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच हा जनता दरबार शहरात आयोजित करण्यात आल्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद दिला. तसेच वनमंत्री नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांमुळे यावेळी अनेकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार शनिवारी मिरा भाईंदर शहरातील अप्पासाहेब धर्माधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात हा दरबार होत असल्याने याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
दरम्यान, महापालिका, महसूल, पोलीस, उपनिबंधक कार्यालयासह शासनाच्या इतर विभागांचे प्रमुख अधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून नागरिकांना टोकनचे वाटप करण्यात आले. टोकन क्रमांकानुसार नागरिकांनी आपापल्या तक्रारी लेखी स्वरूपात मंत्र्यांसमोर मांडल्या.त्यावर नाईक यांनी तक्रारींवर तात्काळ शेरा देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जलद कार्यवायीचे निर्देश दिले.
नाईकांच्या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या समस्या
गणेश नाईक यांच्या जनता दरबारात नागरिकांनी प्रामुख्याने महापालिकेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात मांडल्या. यात मालमत्ता विभाग, पाणी विभाग, बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश अधिक होता. महसूल विभागातील सातबारा फेरफार, सुनावणी प्रक्रियेतीलदिरंगाई अशा तक्रारीही समोर आल्या.याशिवाय काही राजकीय व्यक्ती, कंत्राटदार तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनीही आपापल्या समस्या मांडल्या.
मिरा भाईंदरमध्ये तब्बल अकरा वर्षांनंतर दरबार
२०१४ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना गणेश नाईक मिरा भाईंदरमध्ये जनता दरबारांचे आयोजन करत होते.त्याकाळी नाईक यांच्या या दरबारांना मोठी लोकप्रियता मिळत होती.तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही दडपणाचे वातावरण निर्माण होते. दरम्यान, तब्बल अकरा वर्षांनंतर नाईकांचा जनता दरबार पुन्हा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
