भाईंदर :- मिरारोड रेल्वे स्थानकाबाहेर पडताच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांचा त्रास नागरिकांना जाणवत आहे.याशिवाय फेरीवाल्यांनी स्काय वॉकवर देखील अतिक्रमण केल्याने प्रवाशांना ये जा करण्यास अडचणी येत आहेत.

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर मिरारोड हे महत्त्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे.या स्थानकांवरून हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र,प्रवाशांच्या संख्येनुसार आवश्यक त्या मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत.याशिवाय रेल्वे स्थानकाबाहेर सातत्याने वाढत असलेल्या फेरीवाल्यांच्या संख्येमुळे प्रवासी त्रस्त झाले आहे.

प्रामुख्याने या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. मात्र त्याच मार्गांवर फेरीवाले बस्तान मांडून बसत असल्यामुळे रहदारीच्या वेळेत प्रवाशांना मार्ग काढत चालणे कठीण होत असते. याशिवाय या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्कायवॉकच्या निम्म्या जागेवर देखील फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.परिणामी नेमके चालावे कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे. रेल्वे स्थानकबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त ठेवणार असल्याची घोषणा मिरा भाईंदर महापालिकेने केली आहे. यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा विशेष फौजफाटा राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र काही मोजके दिवस कारवाई करण्याव्यतिरिक्त प्रशासन दुर्लक्षपणा करत असल्याची तक्रार प्रवाशांकडून देण्यात आली आहे. तर फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू असून थेट कायदेशीर पाऊल उचलले जात असल्याचा दावा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्येंनंतरही जाग नाही:

मिरारोड रेल्वे स्थानकाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे.हे फेरीवाले बसण्यास मिळावे म्हणून हफ्ते देत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत असतात. पाच महिन्यांपूर्वीच स्काय वॉक वर बसण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली होती.यामध्ये एकाची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर काही दिवस फेरीवाले बसण्याचे बंद झाले होते. मात्र आता पूर्वीचीच समस्या कायम असून प्रशासनाला हत्येनंतरही जाग आली नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.