भाईंदर : मेट्रो कारशेड उभारणीसाठी प्रशासनाने झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे.मात्र यावर अजूनही अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमी कडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वाढत्या संतापानंतर पालिका आयुक्तांनी झाडे तोडण्याचे काम थांबविण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले.
मेट्रो प्रकल्प क्रमांक ९ अंतर्गत, भाईंदरच्या डोंगरी भागात कारशेड उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी बांधकाम परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, या कारशेडसाठी एमएमआरडीएने तब्बल ११ हजार ३०६ झाडे तोडण्याचे ठरवले आहे. यापैकी १ हजार ४०६ झाडे आधीच तोडण्यात आली असून उर्वरित ९ हजार ९०० झाडांच्या तोडीसाठी मिरा-भाईंदर महापालिकेने १२ मार्च रोजी जनतेसाठी सूचना प्रसिद्ध केली होती. या सूचनेवर हजारो नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.
या संदर्भातील सुनावणी प्रक्रिया ११ एप्रिल रोजी पूर्ण झाली. तर झाडे तोडू नये म्हणून शहरातील २१ हजार नागरिकांनी व सामाजिक संस्थानी स्वाक्षरी केले पत्र देऊन झाडे तोडण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे यावर शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.दरम्यान मागील काही दिवसापासून कंत्राटदाराने परस्पर झाडे तोडण्यास सुरुवात केली असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत.
महापालिकेने काम थांबवले
मेट्रो कारशेडसाठी क्रमांक टाकण्यात आलेली झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर शहरातील पर्यावरण प्रेमींनी एकवटून बुधवारी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली. यावर महापालिका आयुक्तांनी उपायुक्त कल्पिता पिंपळे यांना सांगून झाडे तोडणाऱ्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.