वसई : मिरा भाईंदर महापालिकेने कारवाई केलेल्या २२ डान्स बार पैकी बहुतांश डान्स बार पुन्हा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. हे डान्स बार वेळेची मर्यादा ओलांडून पहाटेपर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. डान्सबारचे अनधिकृत बांधकाम, त्यातही गैरप्रकार आणि पहाटेपर्यंत सुरू असूनही पालिका तसेच पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने संशय व्यक्त होत आहे.

मिरा भाईंदर शहरात जवळ पास ४५ ऑर्केस्ट्रा बार आहेत. यातील बहुतांश डान्सबार हे अनधिकृत असून ते नियमबाह्य पध्दतीने पहाटेपर्यंत चालविले जातात. त्यात महिला वेटरच्या नावाखाली बाराबालांकडून अश्लील कृत्य करवून घेतले जात आहे. यात महापालिका अधिकारी आणि बार चालकांमध्ये मोठा आर्थिक गैर- व्यवहार होत असल्याचा आरोप होत असतो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या डान्स बारविरोधात कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने २२ डान्स बारवर कारवाई करून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते. मात्र ही कारवाई वरवरची असल्याने यातील बहुतांश डान्स बार पुन्हा सुरू झाले आहेत.

डान्स बार पहाटेपर्यंत

शहरातील अनधिकृत बांधकामे असेलल्या डान्स बारवरमध्ये गैरप्रकार होत असतात याशिवाय ते  पहाटेपर्यंत सुरू असतात. मात्र पोलिसांकडून त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. डान्सबारच्या अनधिकृत बांधकामांवरही पालिकेकडून कारवाई कऱण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. डान्सबारना रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक वेळ कुठलाही डान्सबार सुरू नसतो. तसा तो आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती परिमंडळ- १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेला आली जाग, २ डान्सबारवर कारवाई

शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाई कऱणाऱ्या मिरा भाईंदर महापालिकेने डान्स बारच्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने अखेर मंगळवारी ‘केम छो’ आणि ‘कॅटवॉक’ या दोन डान्सबारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. सध्या आम्ही बारवर केली आहे. ज्या डान्सबारने अनधिकृत बांधकामे केली असतील त्यांची पाहणी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण विभाग) नरेंद्र चव्हाण यांनी दिली.