वसई : लोकलमधून प्रवास करताना महिलांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा महिलांची छेडछाड व महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाने महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविली आहे.मुंबई लोकलने प्रवास करताना महिलांना निश्चितच धोक्यांचा सामना करावा लागतो. गर्दीमुळे होणारी गैरसोय, डब्यांमध्ये होणारी गुंडगिरी आणि छेडछाड, तसेच रात्रीच्या वेळी गर्दी नसलेल्या लोकल प्रवासात सुरक्षिततेची कमतरता या काही प्रमुख समस्या आहेत, ज्यामुळे हा प्रवास महिलांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. त्यामुळे विविध घटना समोर येत आहेत.

नुकताच विरार दादर लोकलमधून प्रवास करताना लोकलच्या दरवाज्यात लटकत एका मनोरुग्ण तरुणाने गोंधळ घातला होता. चक्क महिलांच्या डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी केली असल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय सतीश भोर यांच्या नेतृत्वाखाली विरार स्थानकात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महिला अधिकाऱ्यांसह महिलांच्या डब्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.रेल्वे प्रवासादरम्यान एखादी अनुचित घटना घडल्यास महिलांना ७२२९०३४६९० आणि १३९ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच चालत्या गाडीत न चढण्याच्या, लोकलच्या दरवाजावर उभं राहून प्रवास न करण्याच्या सूचना देखील यावेळी महिलांना देण्यात आल्या.

महिलांमध्ये भीतीचे वातावरण

विरार दादर लोकलमध्ये दिवसाढवळ्या घडलेला प्रकार हा अतिशय चिंताजनक आहे. गेल्या काही काळात महिला डब्याशेजारील दिव्यांगांच्या डब्यात चढून छेडछाड करण्याच्या, अश्लील शेरेबाजी करण्याच्या घटना घडत असल्याची प्रतिक्रिया मिताली मोरे या प्रवासी महिलेने दिली. तसेच काही रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, मनोरुग्ण फिरत असतात त्यांच्यावर ही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत महिला प्रवाशांनी व्यक्त केले आहे.