वसई :आगामी महापालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आहे. पालघर मधील जिल्हा परिषद , नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी हा छोटा भाऊ असेल तर वसई विरार मध्ये मोठा भाऊ राहील असे वक्तव्य माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात युती होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मागील पाच वर्षांपासून जिल्हापरिषदा व महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार २ डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. तर नुकताच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांना मोठा धक्का बसला होता. मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत.नुकतीच पालघर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना ( ठाकरे), मनसे आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.यात बविआ आणि महाविकास आघाडीत संभाव्य युती बाबत चर्चा करण्यात आली असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
पालघर मध्ये मविआचे तर वसईत बविआचे वर्चस्व ?
पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदा, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीला देण्यात आला आहे. यामुळे युतीच्या चर्चांना जरी वेग आला असला, तरी नेतृत्वचा प्रश्न अजूनही कायम आहे. याबाबत बोलताना पालघरमधील जिल्हा परिषद , नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी लहान भावाच्या भूमिकेत असेल. पण, वसई विरारमध्ये मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील असे वक्तव्य माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
पक्षांची दोन पावले मागे घेण्याची तयारी असावी…
बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीच्या चर्चा जरी सुरू असल्या तरी रुसवे फुगवे, हट्ट बाजूला ठेऊन पक्षांनी दोन पावलं मागे जायची तयारी ठेवली पाहिजे असे, वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. जिकडे स्वबळावर लढायचे आहे, तिकडे स्वबळावर लढा, असे ठरले आहे. तसेच मला कुणाचीही एलर्जी नाही. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या पक्षांसोबत युती करायला माझी हरकत नसल्याचे देखील हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
