Vasai Dahi Handi 2025 Celebration / वसई – दहिसर मध्ये दहिहंडी सरावादरम्यान ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नालासोपार्‍यातील माजी नगरसेवक अरूण जाधव यांनी त्यांचा दहिहंडी उत्सव रद्द केला आहे. या उत्सवाऐवजी त्यांनी २५ गरजू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा सामाजिक निर्णय घेतला आहे.

दहिसरच्या केतकीपाडा येथील नवतरूण मित्र मंडळात महेश जाधव (११) हा बाल गोविंदाचा सरावादरम्यान खाली पडून मृत्यू झाला होता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखाची होती. हे वृत्त ऐकून सर्वानीच हळहळ व्यक्त केली होती. नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अरूण जाधव यांना देखील या घटनेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी यंदाचा आपला दहिहंडी उत्सव रद्द केला आहे. उत्सव साजरे करणे ही आपली परंपरा आहे, परंतु एका निष्पाप मुलाच्या मृत्यू झाला असताना उत्सव करणे योग्य वाटत नाही असे जाधव यांनी सांगितले. या उत्सवाऐवजी २५ गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अरूण जाधव यांचा दहिहंडी उत्सव भव्य स्वरूपात असतो. मात्र त्यांनी या दुखद घटनेच्या पार्श्वभूमीवर दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकाचा विषय ठरली आहे. पुढील वर्षी देखील दहिहंडी उत्सवाच्या कपात करून शिक्षणावर खर्च केला जाईल असेही जाधव यांनी सांगितले.