वसई- नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्या ठिकाणी आता मातीचे ढिगारे उरले आहे. बेघर झालेले रहिवाशी वाट मिळेल तिथे गेले आहे. मात्र या इमारतीमधील बेघर झालेली ८० वर्षांची एक निराधार वृद्धा या ढिगार्‍याजवळच मागील १५ दिवसांपासून बसून आहे. ना नातेवाईक, ना दुसरे घर घेण्यासाठी पैसे, त्यामुळे आपल्या उद्धवस्त झालेल्या संसाराकडे हताशपणे वाट बघत आता ती आयुष्याची संध्याकाळ होण्याची वाट बघत आहे.

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील आरक्षित जागेवर भूमाफियांनी ४१ अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वसई विरार महापालिकेने ४१ इमारती जमीनदोस्त केल्या. या इमारतींमधील २ हजार कुटुंबे बेघर झाली. या रहिवाशांना जिथे भाड्याने घर घेणे शक्य झाले तिथे ते निघून गेले. आता या ठिकाणी फक्त मातीचे ढिगारे आणि तुटलेल्या इमारतींचे भग्नावशेष शिल्लक आहेत. याच ढिगार्‍यावर मुनिरा शेख (८०) या वयोवृद्ध महिला मागील १५ दिवसांपासून बसल्या आहेत. त्या एकट्याच रोशनी अपार्मटमेंटमध्ये रहात होत्या. त्यांना कुणी नातेवाईक नाही. त्यामुळे त्या एकट्याच खाटेवरच हताशपणे बसल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनिरा शेख पूर्वी वांद्रे येथील बेहरमपाडा येथे रहात होत्या. ३० वर्षांपूर्वी पतीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी अग्रवाल नगरी येथील रोशनी अपार्टमेंटमध्ये ३०० चौरस फुटांचे घर विकत घेतले. ४१ पैकी ही पहिली इमारत होती. आयुष्यभराची जमवलेली ४ लाखांची पुंजी या घरासाठी लावली. घरकाम करून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. १४ फेब्रुवारी रोजी पालिकेने रोशनी इमारत तोडली आणि मुनिरा रस्त्यावर आल्या. त्यांचे कुणीच नातेवाईक नाही. तिच्या बहिणीची मुले परभणीत राहतात. पण त्यांनी देखील संपर्क तोडला आहे. दुसरीकडे रहायला जायचं तर मासिक ५ हजार भाडे आणि ३० हजार डिपॉझिट द्यावे लागतील. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. मी आता कामही करू शकत नाही. मला शेजारी पाजारी मदत करत होते. पण ते स्वत: बेघर झाल्याने ते तरी माझी काळजी कशी करणार असा हताश सवाल मुनिरा शेख यांनी केला. काही सामाजिक संस्थानी आश्रय देण्याची तयारी दर्शवली पण त्यासाठी नमाज पठण करणे सोडण्याची अट घातली. त्याला मुनिरा तयार नाहीत. त्यामुळे त्यांची परिस्थिती आता खूप बिकट झाली आहे. काही सामाजिक कार्यकर्ते मला इथे जेवण देतात. त्यावर मी एकेक दिवस ढकलत आहे. माझ्या सर्व आशा संपल्या आहेत. माझ्या आयुष्याची संध्याकाळ सुरू आहे आणि आता शेवटाची वाट बघत असल्याचे त्यांनी सांगितले.