वसई : वसई पश्चिमेकडील पापडी परिसरातील ‘भाऊसाहेब मोहोळ उद्यान’ (तामतलाव उद्यान) गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असल्यामुळे नागरिक, विशेषतः ज्येष्ठ आणि लहान मुले, त्रस्त झाली आहेत. उद्यानातील बंद दिवे, तुटलेली खेळणी आणि इतर गैरसोयींमुळे उद्यानात फिरणे कठीण होऊन बसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. 

वसई पश्चिमेतील पापडी परिसरात तामतलाव येथे भाऊसाहेब मोहोळ उद्यान आहे. गेल्या काही दिवसांपासून या उद्यानातील बंद असलेल्या दिव्यांमुळे दररोज उद्यानात चालण्यासाठी, तसेच व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची  गैरसोय होत आहे. उद्यानातील तलावाशेजारील अर्ध्या भागातील दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळी चालण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अंधारात चालावे लागत आहे. अनेक जण मोबाईलच्या टॉर्चच्या साहाय्याने आपला मार्ग काढत आहेत. हे उद्यान रस्त्यालगत असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरीसारख्या घटना घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याच उद्यानात वरच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे अशी विविध खेळणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पण, यापैकी सीसॉ, ट्रॅपीझ बार अशी खेळणी पूर्णतः तुटली आहेत. पण तरीही हि खेळणी पालिकेकडून उद्यानातून हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे लहान मुलांना खेळताना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. तसेच यातले एखादे खेळणे कोसळून लहान मुलांचा अपघात होण्याची शक्यताही नागरिकांनी वर्तवली आहे.

तसेच उद्यानाच्या डागडुजींदरम्यान खोदून ठेवलेल्या मातीचे ढीग अजूनही उद्यानात तसेच पडून आहेत. तसेच डागडुजींदरम्यान तुटलेली उद्यानातील आसनं देखील अजूनही बदलण्यात किंवा दुरुस्त करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या खेळण्यांची तसेच दिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला दिव्यांच्या दुरुस्तीसंबंधी याआधीही तक्रारी मिळाल्या आहेत. आम्ही दुरुस्तीचं काम सुरु केलं असून लवकरच ते पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.